सांडपाणी थेट रस्त्यावर; नागरिकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:29 IST2021-08-29T04:29:17+5:302021-08-29T04:29:17+5:30
देऊळगाव राजा : शहरातील चिखली रोडवरील पोस्ट ऑफिस पाठीमागे असणाऱ्या वार्ड क्रमांक एकमध्ये सांडपाणी थेट रस्त्यावर येत आहे. त्यामुळे ...

सांडपाणी थेट रस्त्यावर; नागरिकांची गैरसोय
देऊळगाव राजा : शहरातील चिखली रोडवरील पोस्ट ऑफिस पाठीमागे असणाऱ्या वार्ड क्रमांक एकमध्ये सांडपाणी थेट रस्त्यावर येत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची गैरसोय होत असून, आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील वार्ड क्रमांक एकचा परिसर आणि पटेल स्वामिल जवळील परिसरात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या भागांमध्ये नाली बांधकाम, रस्ता डांबरीकरण झालेले नाही. शहरातील मुख्य अशा या परिसरामध्ये पोस्ट ऑफिस कार्यालय, भारतीय स्टेट बँक शाखा, रुग्णालये, तहसील कार्यालय जाण्यासाठी रस्ता आहे. स्थानिक रहिवाशांनी नगर परिषद कार्यालय प्रशासनाला यासंदर्भात वेळोवेळी निवेदन देऊन नाली बांधकाम आणि रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी केली; परंतु नगर परिषद प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. नगरपालिकेचे वेळकाढू धोरण असल्यामुळे या भागातील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची तक्रारही केली जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण होत आहे.
भाविकांमध्येही संताप
या भागातील अस्वच्छ पाणी सत्यनारायण मंदिर परिसरात आल्याने भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या भागातील विकास कामे करून प्रश्न सोडवावेत, अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर विष्णू राऊत, श्याम गुजर, गोदावरी पवार, दीपाली सपाटे, गजानन कोल्हे, राधाकिसन सपाटे, गजानन भावसार, रवींद्र वनवे, सुरेखा साळी, संगीता लिपारे, रवी जैन, आनंद पिंपळे, संगीता गवळी, सूर्यकांत गवळी, संजय वाघमारे व इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो