डोणगाव येथे भीषण पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:28 IST2021-02-12T04:28:20+5:302021-02-12T04:28:20+5:30
जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे गेल्या महिनाभरापासून ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. महिला व बालकांना पाण्यासाठी ...

डोणगाव येथे भीषण पाणीटंचाई
जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे गेल्या महिनाभरापासून ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. महिला व बालकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. डोणगाव या गावाची लोकसंख्या चार हजार असून, गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरींची संख्या चार आहे. त्यापैकी सावखेडा भोई तलावात एक व तीन विहिरी गावालगतच्या तलावात आहेत. यावर्षी मुबलक पाणीसाठा असल्याने या विहिरींना भरपूर प्रमाणात पाणी आहे. असे असतानाही प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे.
गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या मोटारीमध्ये बिघाड झाल्याने गेल्या महिनाभरापासून गावात निर्जळी आहे. सरपंचाची निवड न झाल्याने प्रशासकाकडे गावाचा कारभार आहे. प्रशासकही याकडे दुर्लक्ष करीत आहे.
-----------
गावाला ज्या ठिकाणाहून पाणीपुरवठा होतो. त्या ठिकाणी यंत्रामध्ये बिघाड झाला आहे. पाईपलाईनलाही गळती लागली आहे. ते शोधण्याचे काम सुरू आहे. लवकरच गावाला सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल.
जगदीश आढाव, ग्रामसेवक