रामेश्वर सोनवणे यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST2021-07-09T04:20:08+5:302021-07-09T04:20:08+5:30
डॉक्टर नसल्याने उपचार मिळेना भोकरदन : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे शटर नेहमीच बंद राहात आहे. त्यामुळे ...

रामेश्वर सोनवणे यांची निवड
डॉक्टर नसल्याने उपचार मिळेना
भोकरदन : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे शटर नेहमीच बंद राहात आहे. त्यामुळे आजारी पशुधनाला घेऊन येणाऱ्या पशुपालक, शेतकऱ्यांना आल्या पावली परतावे लागत आहे. त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने जनावरांचे हाल होत आहेत.
जामखेड परिसरात वन्यप्राण्यांचा उपद्रव
जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड परिसरात वन्यप्राणी कोवळ्या पिकांची नासधूस करीत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. जामखेड व परिसरात अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने कापूस, तूर, सोयाबीन, बाजरी, मका आदी पिकांचा समावेश आहे. बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यातच वन्यप्राणी उगवलेल्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत आहेत.
कार्यालय सुरू करण्याची मागणी
जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील वरूड बुद्रुक येथे राज्य महावितरण कंपनीचे शाखा कार्यालय सुरू करावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंता पहुरकर यांना देण्यात आले. या निवेदनावर मंगेश गव्हाड, समाधान काकडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
रिक्षाचालकांना मदतीची प्रतीक्षा
जालना : परवानाधारक रिक्षाचालकांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, रिक्षाचालकांनी सादर केलेले अर्ज मंजूर करण्याची मागणी मराठवाडा ऑटोरिक्षा युनियनचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी यांनी महाराष्ट्र परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शिक्षक क्लबतर्फे निबंध स्पर्धा
जालना : शहरातील शंभर शिक्षक क्लबतर्फे राज्यस्तरीय शिक्षकांसाठी निबंध लेखन स्पर्धा घेण्यात येत आहेत. स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्या पहिल्या दहा विजेत्या शिक्षकांना मानाचा फेटा, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान केला जाईल. सहभागी सर्व शिक्षकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
रमेश थोरवे यांचा अंनिसतर्फे सत्कार
जालना : जालना तालुक्यातील गोलापांगरी येथील नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी रमेश थोरवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचा अंनिसतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गिराम, प्रधान सचिव मधुकर गायकवाड, संजय हेरकर, प्रशांत वाघ, राजेंद्र साबळे, सेनाजी काळे, मयुर जयस्वाल आदींची उपस्थिती होती.
विस्कळीत वीजपुरवठा, ग्राहकांची गैरसोय
जालना : जालना तालुक्यातील रामनगर व परिसरातील वीजपुरवठा अचानक गुल होण्याचे प्रमाण वाढले आहे. वीज अचानक गायब होत असल्याने ग्राहकांना एक ना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. त्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी उपलब्ध पाणी पिकांना देण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु विजेअभावी शेतकऱ्यांचीही गैरसोय होत आहे.
अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईची मागणी
घनसावंगी : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारू विक्री जोमात सुरू आहे. तळीरामांमुळे भांडण - तंट्यात वाढ होत असून, कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय महिला, मुलींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाने लक्ष देऊन कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.