जिल्ह्यातील सुरक्षा राम भरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:56 IST2021-02-06T04:56:40+5:302021-02-06T04:56:40+5:30
- A जालना : जिल्ह्यातील एकूण १८ पोलीस ठाण्यांत कार्यरत असलेल्या १ हजार ५७४ पोलीस कर्मचाऱ्यांवर जवळपास २३ लाख ...

जिल्ह्यातील सुरक्षा राम भरोसे
- A
जालना : जिल्ह्यातील एकूण १८ पोलीस ठाण्यांत कार्यरत असलेल्या १ हजार ५७४ पोलीस कर्मचाऱ्यांवर जवळपास २३ लाख ०४ हजार ५०० नागरिकांच्या सुरक्षेचा भार आहे. शिवाय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताणही पडत आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे जिल्ह्यातील सुरक्षा राम भरोसे असल्याचे दिसून येत आहे.
जालना जिल्ह्यातील सरासरी लोकसंख्या २३ लाख ०४ हजार ५०० इतकी आहे. त्या तुलनेत पोलीस दलातील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या संख्येचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. जिल्ह्याला आणखी दोन ते अडीच हजार कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र, सध्या केवळ १,५७४ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांपैकीही काहीजण आरोग्य रजेवर, प्रसूती रजेवर किंवा निलंबित असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण अधिकच वाढला आहे.
गतवर्षात गुन्हेगारी वाढली
जिल्ह्यात घरफोडी, दरोडा, अत्याचार, खून या गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. जिल्ह्यात गतवर्षी ३६ जणांचा खून झाला आहे; तर ९३ जणांचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बलात्काराच्या ५९ घटनांची नोंद आहे; तर २८८ घरफोडी व १२ ठिकाणी दरोडा पडल्याची नोंद आहे. कर्मचाऱ्यांची संख्या व अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळेही गुन्हेगारीमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, त्यामुळेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मनुष्यबळही कमी आहे हे मान्य आहे. तरीही आम्ही कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत. लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस कर्मचाऱ्यांची असलेली संख्या व जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण यामुळे पोलिसांवर ताण येत आहे.
- विनायक देशमुख, पोलीस अधीक्षक
पोलिसांवर ताण
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच मोर्चे, मंत्र्यांचा दौरा, लॉकडाऊन यांच्या बंदोबस्तामुळे पोलिसांवर अधिकचा ताण वाढत आहे. गुन्ह्यांचा तपास पूर्ण करावा की, बंदोबस्तावर जावे, असा प्रश्न पोलिसांसमोर उभा आहे.
.....................................