सावित्रीच्या लेकींनो, तुम्ही उत्तुंग भरारी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:20 IST2021-01-13T05:20:56+5:302021-01-13T05:20:56+5:30
टेंभुर्णी : सावित्रीबाईंनी महिलांना जोखडातून मुक्त केले. त्यांच्यासाठी शिक्षणाची दारे उघडी केली. सावित्रीच्या लेकींनो तुम्ही आता उत्तुंग भरारी घ्या. ...

सावित्रीच्या लेकींनो, तुम्ही उत्तुंग भरारी घ्या
टेंभुर्णी : सावित्रीबाईंनी महिलांना जोखडातून मुक्त केले. त्यांच्यासाठी शिक्षणाची दारे उघडी केली. सावित्रीच्या लेकींनो तुम्ही आता उत्तुंग भरारी घ्या. हे विशाल जग तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहे, असे विचार जाफराबाद तालुक्यातील व्याख्याते तथा एक्साईजचे पीएसआय रमेश विठोरे यांनी व्यक्त केले. बालिका दिनाचे औचित्य साधून जाफराबाद तालुक्यातील गोंधनखेडा येथे ‘सावित्रीनंतरच्या सावित्रीच्या लेकी’ या विषयावर रविवारी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी वाशीम येथील एसीबीचे पीआय निवृत्ती बोराडे, सामाजिक कार्यकर्ते दीपक बोराडे आदींची उपस्थिती होती.
विठोरे म्हणाले की, दिवसेंदिवस सावित्रीच्या लेकीसमोरील आव्हानेही काळानुरूप बदलत आहेत. विज्ञान आणि टेक्नॉलॉजीने हे जग अतिशय जवळ आणले असून, भारतीय मुलींंना आज जागतिक स्पर्धेत आपला ठसा उमटावयचा आहे. अनेकजणी आज सावित्रीबाईंना अपेक्षित यशाला गवसणी घालीत असल्या तरी थांबून चालणार नाही. तुम्हाला अवकाशाशी स्पर्धा करायची आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी निवृत्ती बोराडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तर सावित्रीबाईंच्या वेशात असलेल्या चिमुकल्या मुलींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी मुलींचीही भाषणे झाली. सहभागी मुलींना वही-पेनचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन अजय बोराडे यांनी केले तर भागवत गोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी गावातील महिला, पुरुष, शालेय विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.
फोटो
गोंधनखेडा येथील व्याख्यान कार्यक्रमात मुलींसोबत व्याख्याते रमेश विठोरे, निवृत्ती बोराडे, दीपक बोराडे आदी.