Sandalwood against sand mafia ..! | वाळू माफियांविरूद्ध प्रशासनाचा बडगा..!
वाळू माफियांविरूद्ध प्रशासनाचा बडगा..!

ठळक मुद्देउशीरा का होईना कारवाईस प्रारंभ । ५०० पेक्षा अधिक ब्रास वाळू जप्त

अंबड / गोंदी : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गोंदी तसेच अन्य गावामध्ये गेल्या काही वर्षापासून सर्रासपणे अवैध वाळुचा उपसा सुरूच असतो. या संदर्भात वारंवार कारवाई करूनही वाळू माफिया कोणालाच जुमानत नाहीत. त्या पार्श्वभुमीवर शनिवारी सकाळ पासूनच महसूल आणि पोलिसांच्या पथकाने गोंदी जवळील गोदापात्रात धडक कारवाई करत ५०० ब्रास वाळुसाठे जप्त केल्याचे सांगण्यात आले.
गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा उपसा केल्या जात असल्याच्या घटना नवीन नाहीत. यापूर्वीही या प्रकरणी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनीही यात लक्ष घातले होते. परंतु, नंतर पुन्हा जैसे थे उपसा सुरू झाला. हा उपसा सुरू होण्यामागे वाळू माफिया, राजकीय लागेबांधे आणि अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध हे देखील जबाबदार आहेत.
शनिवारी अंबडचे उपविभागीय अधिकारी हजगल, तहसीलदार मनिषा मेने, मंडळ अधिकारी कुरेवाड, एस. ए. गाढेकर, राम कोंडगिर, श्रीपाद कोकटवार, कृष्णा देशमुख, कृष्णा मुजगुले, धम्मपाल गायकवाड, प्रवीण शिनगारे, सतिश पे्रमबत्ती, अशोक शिंदे, संदीप धारे अशा २० जणांनी गोंदी जवळील गोदावरी नदीपात्रात वाळुमाफियांनी साठविलेले वाळूचे ढिग जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्रात टाकले. तसेच नदीपात्रा शेजारी असलेल्या वाळू साठ्यांचे ढिग ट्रकद्वारे गोंदी पोलिसांच्या हद्दीत आणून जमा केले आहे. हे जमा केलेले वाळुसाठे आणि नदीपात्रात टाकलेली वाळू ही जवळपास ५०० ब्रास म्हणजेच बाजार मुल्यानुसार १५ लाख रूपयांचे होत आहेत. या वाळुसाठ्यांचा लिलाव नंतर केला जाणार असल्याची माहिती मनिषा मेने यांनी दिली.
दरम्यान, अशा प्रकारची कारवाई यापूर्वीही करण्यात आली होती. परंतु, त्याचा कुठलाही उपयोग होत नसून अधिकारी आणि वाळू माफियांच्या परस्पर संबंधामुळे हा गोरखधंदा अव्याहतपणे सुरू आहे. एकुणच या वाळू उपसा प्रकरणामुळे प्रशासनाला रॉयल्टीच्या स्वरूपात मिळणारे उत्पन्न घटत आहे. शनिवारी झालेल्या कारवाईच्या वेळी तहसीलदारांनी जेसीबीच्या माध्यमातून गोदावरी नदीपात्रात जाणारे रस्ते खोदून ठेवले आहेत.
वाळुसाठाप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल
उस्वद परिसरात वाळू माफियांनी स्वत:च्या व अन्य वाहनांनी सरकारी जमीनीवर अंदाजे १९७ ब्रास, महादेव मंदिर परिसरात अंदाजे १८० ब्रास, मंठा व लोणार रस्त्यालगत ठिकठिकाणी ८०० ब्रास असा एकूण १ हजार १७७ ब्रास अवैधरित्या वाळूचा साठा करण्यात आला.
तहसीलदार सुमन मोरे यांच्या सुचनेवरून मंडळ अधिकारी गणेश कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून गजानन भास्कर जाधव, अविनाश भिमराव सरोदे, दीपक शेषराव लोमटे, दीपक नायबराव राऊत, विनोद दामोधर जाधव, सुधाकर महादेव सरोदे, रंगनाथ नायबराव सरोदे व इतर (सर्व रा. उस्वद ता. मंठा) यांच्यावर भादंवि कलम ३७९, ३४ सह कलम ३ व ४ गौण खनिज कायदा प्रमाणे शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सात जणांवर गुन्हा
तळणी : मंठा तालुक्यातील उस्वद येथील नदी पात्रातून अवैधरित्या वाळूचे उत्खनन करुन फेर विक्रीसाठी ठिकठिकाणी वाळू साठे केल्याप्रकरणी मंडळ अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.


Web Title: Sandalwood against sand mafia ..!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.