संत, मायबापचं निस्वार्थपणे उपकार करू शकतात- हभप इंदोरीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:32 IST2021-02-11T04:32:35+5:302021-02-11T04:32:35+5:30
परतूर : या जगात संत व मायबाप सोडले, तर कोणीच कोणावर निस्वार्थपणे उपकार करीत नाही, असे प्रतिपादन विनोदाचार्य हभप. ...

संत, मायबापचं निस्वार्थपणे उपकार करू शकतात- हभप इंदोरीकर
परतूर : या जगात संत व मायबाप सोडले, तर कोणीच कोणावर निस्वार्थपणे उपकार करीत नाही, असे प्रतिपादन विनोदाचार्य हभप. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले.
परतूर तालुक्यातील येणोरा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री हभप. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन झाले. या प्रसंगी ते बोलत होते. हभप. इंदोरीकर महाराजांनी संत तुकाराम महाराज यांच्या ‘बुध्दीचा पालट धरारे काही, मागूता हा नाही मनुष्य देह, आपुल्या हिताचे नव्हती सायास’ या अंभगावर कीर्तन केले.
पुढे इंदोरीकर म्हणाले की, आपण ज्या कामासाठी आलो, तेच काम करा. या जगात कोणीच कोणावर उपकार करीत नाही, केवळ संत व मायबाप हेच निस्वार्थपणे उपकार करतात. या दोघांशिवाय दुसरा उपकार करूच शकत नाही. एखाद्याने गावाला रस्ता केला, पण तो फुकट नाही केला, त्याची टक्केवारी काढून केला. आपल्या शरीरात देव राहतो असेल, तर त्याचे नामस्मरण करायला काय हरकत आहे. जगाला रात्रंदिवस एकच आमचा विठ्ठल सांभाळतो, अमेरिका जगात श्रीमंत, चीन बुध्दिवान, इंग्लंड विज्ञानात तरबेज असे असतानाही येथे कोरोनाच्या काळात अनेकजण मरण पावले. आपल्या भारतात कोरोनाची दुसरी लाटच आली नाही. महाराष्ट्र ही संत व शुरांची भूमी आहे. कोरोनाच्या काळात पोलीस व डॉक्टरांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचे सत्कार व्हायलाच हवे. युवकांनी व्यसनाच्या आहारी न जात कर्तृत्वान व्हावे, असेही त्यांनी सांगितले. या प्रसंगी भविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
फोटो
परतूर तालुक्यातील येणोरा येथे कीर्तन सोहळ््यात बोलताना हभप. निवृत्ती महाराज इंदोरीकर.