माहोरा येथील रोहित्रची समस्या सुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:36 IST2021-09-09T04:36:55+5:302021-09-09T04:36:55+5:30
माहोरा : जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे आठ दिवसांपासून रोहित्र जळाल्याने अर्धे गाव अंधारात आहे. वारंवार महावितरणकडे रोहित्र दुरुस्ती करून ...

माहोरा येथील रोहित्रची समस्या सुटेना
माहोरा : जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे आठ दिवसांपासून रोहित्र जळाल्याने अर्धे गाव अंधारात आहे. वारंवार महावितरणकडे रोहित्र दुरुस्ती करून देण्याची मागणी करण्यात आली. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे बुधवारी ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता.
माहोरा हे गाव जाफराबाद तालुक्यातील मोठे गाव आहे. येथे मोठी बाजारपेठही आहे. असे असतानाही गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. आठ दिवसांपूर्वी गावातील रोहित्र जळाले. यानंतर ग्रामस्थांनी ते रोहित्र महावितरणकडे दुरुस्तीसाठी दिले. ग्रामस्थांना दोन दिवसांत रोहित्र येण्याची अपेक्षा होती. परंतु, आठ दिवस उलटूनही रोहित्र आले नाही. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारले असता ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. अर्धे गाव अंधारात असल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळी फॅन बंद असल्याने डास चावत आहेत. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. दोन दिवसांत रोहित्र दिले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिली आहे. याप्रसंगी सरपंच वैशाली कासोद, उपसरपंच गजानन साळोक यांच्यासह महिलांची उपस्थिती होती. जालना येथे रोहित्रला लागणारे ऑईल नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. एक ते दोन दिवसांत रोहित्र दुरुस्त करून दिले जाईल, असे आश्वासन इंजिनिअर प्रशांत गीते यांनी यावेळी दिले.