कोरोना उदय,कहर अन् अस्ताकडे वाटचाल - मागोवा २०२०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:23 IST2020-12-27T04:23:07+5:302020-12-27T04:23:07+5:30
चौकट हे महत्वाचे कार्यक्रम पार पडले अन्... २०२० या वर्षाचा ढोबळपणे आढावा घेतांना जानेवारी, फेब्रुवारी हे दोन महिने नाॅर्मल ...

कोरोना उदय,कहर अन् अस्ताकडे वाटचाल - मागोवा २०२०
चौकट
हे महत्वाचे कार्यक्रम पार पडले अन्...
२०२० या वर्षाचा ढोबळपणे आढावा घेतांना जानेवारी, फेब्रुवारी हे दोन महिने नाॅर्मल गेले. मार्चमध्ये मात्र कोरोनाची चाहूल लागली होती. या वर्षात जालन्यातील नाट्यांकुरचा बालनाट्य महोत्सव उत्साहात पार पडला. एक आणि दोन फेब्रुवारीला प्रतिभा संगम साहित्य संमेलनही जोरात झाले. मार्चमध्ये जर्मन डॉक्टरांनी येथील मिशन हॉस्पिटलमध्ये ओठ फाटणे, टाळू चिकटण्याच्या आजारावर यशस्वी शस्त्रक्रियाही केल्या. १४ आणि १५ मार्चला विद्रोही साहित्य संमेलनही थाटात होऊन वैचारिक मंथन झाले. परंतु २२ मार्च नंतर संचारबंदी सुरू झाली आणि सर्व व्यवहार ठप्प झाले. ७ मे नंतर उद्योगांची चाके फिरण्यास प्रारंभ झाला परंतु आजही केवळ स्टील उद्योग वगळता अन्य उद्योग अडचणींचा सामना करून आपले अस्तित्व टिकवून आहेत.
चौकट
कामगारांचे जथ्थे पायी
अन्य आजारांप्रमाणे कोरोनानेही गरीब, श्रीमंत हा भेद ठेवला नाही. त्यामुळे घराबाहेर न पडणाऱ्यांनाही काेराेनाची लागण होऊन अनेकांना जीव गमवावे लागले. जालन्यात १३ हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून, जवळपास ३४३ जणांचे बळी या आजाराने घेतले आहेत. जालन्यातील विविध उद्योगातील कामगारांनी पाठविण्याची व्यवस्था करूनही पायी वारीव्दारे हजारो किलोमीटरचा प्रवास करून गाव गाठले.
चौकट
अपघात आणि स्फोटाने हळहळ
जालन्यातील कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाला गुंगारा देत रेल्वे रूळाव्दारे पायी औरंगाबादकडे जात असतांना वाटेत रेल्वे रूळावर झोपले होते. त्यावेळी मालगाडीने जवळपास १६ कामगारांना चिरडले होते. त्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. तसेच अन्य एका स्टील उद्योगात भट्टीचा स्फोट होऊन १३ कामगारांचा मृत्यू ही देखील एक भळभळती जखम उद्योग आणि कामगार क्षेत्रात ताजी आहे.
चौकट
काेराेनामुळे लॅब, ऑक्सिजन प्लँटची उभारणी
कोरोनाची चाचणी करण्यासाठी येथे दहा कोटी रूपये खर्च करून स्वतंत्र लॅब उभारली आहे. तसेच दोन ऑक्सिजन प्लँट उभारले असून, जिल्हा रूग्णालयांसह अन्य रूग्णालयांचा कायापालट झाला आहे. यासाठी जालन्यातील स्टील, बियाणे उद्योगांप्रमाणेच अन्य उद्योजक, व्यापाऱ्यांनी मोठी आर्थिक मदत केल्यानेच हे शक्य झाले. लॅबसह अन्य वैद्यकीय सुविधेसाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे मोठे सहकार्य लाभले.
अन्नदानाचा महयज्ञ
कोरोना काळात जालन्यातील विविध संस्था, दानशूर व्यक्ती, रोटरी क्लब, लायन्स क्लब, दत्ताश्रम संस्थान, अन्नामृत, आनंदी स्वामी मंदिर, स्वामी समर्थ सेवा शिष्य परिवार, आ. कैलास गोरंट्याल यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेले भूदेवी अन्नछत्र, शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी केलेली कोरोना जागृती तसेच अन्नदानानेही गाेरगरिबांना मोठी मदत केली.
चौकट
उद्योजकांकडून भरीव मदत
कोरोना काळात कोविड हॉस्पिटलची उभारणी करण्यासह व्हेंटिलेटर खरेदी करणे, ऑक्सिजन प्लँटची उभारणी करण्यासाठी मोठी मदत येथील उद्योजकांनी केली. येथील स्टील निर्माता असोसिएशनने अडीच कोटी रूपये दिले. तर महिकोने ऑक्सिजन प्लँटसाठी ६० लाख रूपये दिले आहेत. यासह अन्य बियाणे,खत उद्योजकांनी देखील आर्थिक मदत केल्याने प्रशासनास मोठा हातभार लागला.
चौकट
कोविड योद्धयांचे योगदान
ऐन कोराेना काळात डॉक्टर, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा प्रशासन, परिचारिका तसेच आयएमए या संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले जीव धोक्यात घालून नागरिकांना मोठी मदत केली. पोलीस प्रशासनाचाही यात सिंहाचा वाटा आहे.