ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, निश्चिंत रहा; महाजन यांचा साखळी उपोषणकर्त्यांशी संवाद
By विजय मुंडे | Updated: December 21, 2023 19:46 IST2023-12-21T19:45:22+5:302023-12-21T19:46:09+5:30
शासनाच्या शिष्टमंडळातील मंत्री मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेण्यासाठी जात असताना वाटेतच ओबीसी समाज बांधवांनी मंत्र्यांचा ताफा अडविला.

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, निश्चिंत रहा; महाजन यांचा साखळी उपोषणकर्त्यांशी संवाद
वडीगोद्री (जि.जालना) : ओबीसी समाजाने तुमचं आरक्षण जाईल, हे मनातून काढून टाकावे. ओबीसी आरक्षणाला एक टक्का ही धक्का लागणार नाही तुम्ही निश्चितंत रहा, असा विश्वास मंत्री गिरीष महाजन यांनी साखळी उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांना दिला.
वडीगोद्री येथे १७ दिवसांपासून ओबीसी आरक्षण बचावसाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळाला मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत, मंत्री संदीपान भुमरे, मंगेश चिवटे यांनी भेट देवून ओबीसी समाज बांधवांशी चर्चा केली. उपोषणकर्ते व ओबीसी बांधवांनी शिंदे समिती बरखास्त करावी, मराठ्यांना ओबीसी आरक्षण देऊ नये, जाती निहाय जणगणना करावी, दिलेले प्रमाणपत्र तात्काळ रद्द करावेत, अशी मागणी केली. मंत्री महाजन यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार दिले जाणार आहे. जातीनिहाय जणगणना केली जाणार आहे. मनोज जरांगे यांची सरसकट आरक्षण देण्याची मागणी असून, तसे आरक्षण देता येणार नसल्याचे ते म्हणाले.
उपोषणकर्त्यांनी मंत्र्यांचा ताफा अडविला
शासनाच्या शिष्टमंडळातील मंत्री मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेण्यासाठी जात असताना वाटेतच ओबीसी समाज बांधवांनी मंत्र्यांचा ताफा अडविला. त्यावेळी मंत्र्यांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर परत जाताना आपल्याशी संवाद साधू असे आश्वासन देत ताफा पुढे नेला. त्यावेळी उपस्थितांनी छगन भुजबळ साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है. एकच पर्व ओबीसी अशा घोषणा दिल्या.