सत्ताधारी, विरोधकांकडून पालिकेच्या कामाचे वाभाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:29 IST2020-12-29T04:29:47+5:302020-12-29T04:29:47+5:30
नगरसेवक विजय चौधरी यांनी जिंदल मार्केटमधील तिसऱ्या मजल्यावर दुकाने बांधली असून, त्याची परवानगी नसल्याचा मुद्दा उपस्थित केला, तसेच शिवाजी ...

सत्ताधारी, विरोधकांकडून पालिकेच्या कामाचे वाभाडे
नगरसेवक विजय चौधरी यांनी जिंदल मार्केटमधील तिसऱ्या मजल्यावर दुकाने बांधली असून, त्याची परवानगी नसल्याचा मुद्दा उपस्थित केला, तसेच शिवाजी महाराज पुतळा परिसरातही परवानगीपेक्षा अधिकचे बांधकाम केले जात असल्याचे ते म्हणाले. यावेळी शाह आलमखान यांनी इन्कमटॅक्स कॉलनीतील स्टेडियमजवळ डीपी मार्ग असताना इमारत बांधकामाच्ळा परवानगीचा मुद्दा मांडून पाणी पुरवठ्याबाबात काय नियोजन केले, अशी विचारणा केली. शिवसेनेचे गटनेते विष्णू पाचफुले यांनी मंमादेवी ते रेल्वेस्थानक मार्गाची झालेली रस्त्याची चाळणी, तसेच अन्य महत्त्वपूर्ण मुद्दे मांडून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ढक्का यांनी लोखंडी पुलाला मंमादेवी पूल असे नाव देऊन प्रवेशद्वार उभारण्याची मागणी केली.
दरम्यान, नगरसेवकांनी उपस्थित केलेले अवैध बांधकाम, तसेच पार्किंगच्या मुद्याची सविस्तर चौकशी केली जाईल, असे सांगितले. यावेळी यापूर्वीही असेच आश्वासन देण्यात आल्याचे स्मरण त्यांना काही संतप्त नगरसेवकांनी करून दिल्याचे दिसून आले. अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्रात आता जालना पालिकेकडून एक मेगावॅटची सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी महात्मा फुले मार्केटची उभारणी होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले, तसेच यात जुन्या व्यापाऱ्यांना प्राधान्य देण्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी नगरसेवक शशिकांत घुगे, अरुण मगरे, रामेश्वर ढोबळे, रमेश गौरक्षक, विजय पवार, फारुक तुंडीवाले, आमेर पाशा, जयंत भोसले, विजय पांगारकर आदींची उपस्थिती होती. यावेळी विषय पत्रिकेवरील ३३ विषयांना मंजुरी देण्यात आली. सभेला पालिकेचे अधीक्षक विजय फुलंब्रीकर यांचीही उपस्थिती होती.
चौकट
महिलांनी मांडले प्रश्न
आज झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेविका रुबिना खान, रफियाबेगम, संध्या देठे, पूनम स्वामी, वैशाली जांगडे यांनीदेखील त्यांच्या प्रभागातील मुद्दे मांडले. स्वामी यांनी आपल्या गेल्या वर्षभराच्या काळात पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न नमूद केले. या सर्व प्रश्नांना नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी अत्यंत संयमाने आणि अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. नगरसेवकांनी त्यांचे मुद्दे लेखी स्वरूपात देण्याची मागणी केली. त्या सर्व मुद्यांची उत्तरे त्यांना देण्यात येतील, असे सांगून गोंधळ न घालण्याचे आवाहन केले होते.