कोरोना रूग्णांना दिलासा : आणखी २५० अतिरिक्त बेडची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:31 IST2021-04-04T04:31:14+5:302021-04-04T04:31:14+5:30
जालना : कोरोनाचा फास दिवसेंदिवस घट्ट होत आहे. त्यामुळे नागरिक आणि प्रशासन हवालदिल झाले आहेत. अशातच कोरोना रूग्णांवर उपचार ...

कोरोना रूग्णांना दिलासा : आणखी २५० अतिरिक्त बेडची व्यवस्था
जालना : कोरोनाचा फास दिवसेंदिवस घट्ट होत आहे. त्यामुळे नागरिक आणि प्रशासन हवालदिल झाले आहेत. अशातच कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक तेवढे बेड शिल्लक नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत जिल्हा सामान्य रूग्णालयातील विविध इमारतींमध्ये अतिरिक्त २५० ऑक्सिजनयुक्त बेडची व्यवस्था करण्याचे नियोजन असून, त्याचे कामही सुरू झाले आहे. जालना जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सरासरी ५००पेक्षा अधिक रूग्ण आढळत आहेत. ही रूग्णवाढ चाचण्या वाढल्याने समोर येत असून, दररोज साधारण एक हजार चाचण्या होत आहेत. स्वॅब देणाऱ्यांची संख्याही आता वाढली असून, यात आणखी वाढ करण्याचे नियोजन आरोग्य तसेच जिल्हा प्रशासनाने केले आहे. मध्यंतरी जालन्यातील शासकीय तसेच खासगी रूग्णालयांमध्ये बेडचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे अनेकांना जंगजंग पछाडूनही बेड मिळत नव्हते. रुग्णालयात बेड मिळावेत म्हणून अनेक रूग्ण तसेच त्यांचे नातेवाईक राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना संपर्क करून विनवणी करताना दिसून आले. अनेकांना यामुळे औरंगाबाद येथे उपचारासाठी जावे लागले होते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने जालना जिल्हा रूग्णालयातील वेगवेगळ्या इमारतींमध्ये ही व्यवस्था केल्याचे सांगण्यात आले.
चौकट
असे केले अतिरिक्त बेडचे नियोजन
जालना जिल्हा रूग्णालयातील विविध विभागांमध्ये ही ऑक्सिजनयुक्त बेडची व्यवस्था केली जात आहे. त्यात जिल्हा सामान्य रूग्णालयातील इमारतीत ११०, नेत्र विभाग ३०, कोविड हॉस्पिटल २०, परिचारिका हॉस्पिटल ४० असा समावेश करण्यात आला आहे. याआधीही जिल्हा रूग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग हा महिला रूग्णालयात हलविण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातच हे २५० बेड मिळणार असल्याने मोठा दिलासा कोरोना रूग्णांना मिळणार आहे.