रिफाइंडमुळे वाढते चरबी; घाणा तेलाची मागणी वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:35 IST2021-08-18T04:35:47+5:302021-08-18T04:35:47+5:30
जालना : स्पर्धेच्या युगात होणारी धावपळ आणि रिफाइंड तेलामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता होत आहे. विविध आजाराला निमंत्रण ...

रिफाइंडमुळे वाढते चरबी; घाणा तेलाची मागणी वाढली!
जालना : स्पर्धेच्या युगात होणारी धावपळ आणि रिफाइंड तेलामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता होत आहे. विविध आजाराला निमंत्रण देणाऱ्या रिफाइंड तेलाऐवजी आता घाणा तेलाची मागणी नागरिक करू लागले आहेत.
ह्रदयरोग, कॅन्सर, श्वसनाचे आजार अशा विविध आजारांनी ग्रस्त असलेले रुग्ण रिफाइंड तेल टाळू लागले आहेत. अनेकांना वैद्यकीय अधिकारीही तेलाचे प्रमाण कमी करण्याबाबत आणि शुद्ध तेल घेण्याबाबत सूचना करतात. त्यामुळे अनेक नागरिक आता घाणा तेलाला पसंती देत आहेत.
म्हणून वाढत आहेत हृदयरोगी
आज दैनंदिन अन्नपदार्थांमध्ये रिफाइंड तेलाचा मारा होत आहे. तेलात वेगवेगळे केमिकल असतात. शिवाय अधिक प्रमाणात तेलाचे सेवन केल्यामुळे शरीरात होणारे बदल आणि त्याचा थेट हृदयावर होणारा परिणामही गंभीर आहे.
लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय
कच्चे घाणीचे तेल तयार करण्याची प्रक्रिया साधी आहे. या प्रक्रियेत तेलातील नैसर्गिक घटकही कायम राहतात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी रिफाइंड तेलापेक्षा लाकडी घाण्याच्या तेलाचा अधिक उपयोग होताना दिसतो.
रिफाइंड तेल घातक का?
रिफाइंड तेल तयार करण्यासाठी उच्च तापमानाची आवश्यकता असते. उच्च तापमानामुळे तेलातील आवश्यक व नैसर्गिक घटक कमी होतात.
या तेलाचा अतिवापर केला तर हृदयरोग, पचन संस्थेचे आजार, श्वसनाच्या आजारासह इतर आजार जडू शकतात.
अधिक तेलाचा वापर घातकच
दैनंदिन अन्नपदार्थांमध्ये अधिक तेलाचा वापर करणे हे मानवी शरीरासाठी घातकच आहे. त्यामुळे नागरिकांनी तेलाचा वापर कमी करावा. शक्यतो लाकडी घाण्याचे तेल आहारात समाविष्ट करावे, रिफाइंड तेलापेक्षा लाकडी घाण्याचे तेल अधिक चांगले असते.
-डॉ. व्ही.व्ही. पिंगळे, आहारतज्ज्ञ, जालना