बदनापूर येथील निर्मल क्रीडा प्रबोधन ट्रस्ट आणि लोकमत वृत्तपत्र समूहाच्या संयुक्त विद्यमाने लोकमत रक्ताचं नातं या अंतर्गत मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन पाथरीकर कॅम्पसमध्ये करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटक तथा जालन्याचे पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, लोकमत वृत्तपत्र समूहाचे कार्यकारी संचालक करण दर्डा, निर्मल प्रबोधन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. देवेश पाथ्रीकर, संचालिका सोनाली पाथ्रीकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी संपादक चक्रधर दळवी, प्राचार्या डॉ. एम. डी. पाथ्रीकर, डॉ. एस. एस. शेख, डॉ. एन. जी. खान, फार्मसीचे प्राचार्य प्रा. सुनील जायभाये यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना अधीक्षक देशमुख म्हणाले की, कोरोना काळात सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखून शासनस्तरावर सर्व ती खबरदारी घेतली जात आहे. असे असतानाच रक्त हा घटकही तितकाच महत्त्वाचा असल्याचे सांगून त्यांनी लसीकरणाबाबत नागरिकांनी पाठीमागे न राहता त्यासाठी पुढकार घेण्याचे आवाहन देशमुख यांनी केले.
चौकट
रक्ताचं नातं उपक्रमाने भारावलो : डॉ. देवेश पाथ्रीकर
गरजूंना एका वेळेस पैसे कुणाकडूनही मिळतील; पण रक्त वेळेवर मिळत नाही. त्यामुळे लोकमतने सुरू केलेला रक्तदानाचा उपक्रम स्तुत्य असून जनतेने मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याची हीच खरी वेळ आहे, असे आवाहन निर्मल क्रीडा व प्रबोधन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. देवेश पाथ्रीकर यांनी केले. दरम्यान , बदनापूर तालुक्यात उच्च शिक्षणाची व्यवस्था नसल्यामुळे डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर यांनी १९९७ पासून येथे महाविद्यालय सुरू केले व त्यानंतर येथे उच्च शिक्षणासाठीच्या सर्व सुविधा पुरविल्या आहेत. कोरोना काळात दीड लाख आर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचे वाटप केल्याचे ते म्हणाले. सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा असल्यामुळे लोकमतने सुरू केलेल्या या रक्ताच्या महायज्ञात आमच्या महाविद्यालयासह अन्य सर्व घटकांनी आम्हांला मदत केल्यानेच आजचे हे शिबिर यशस्वी झाल्याचे डॉ. देवेश पाथ्रीकर म्हणाले.