रेकॉर्ड ब्रेक... दोन दिवसांत ५० हजार नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:36 IST2021-09-17T04:36:07+5:302021-09-17T04:36:07+5:30
विजय मुंडे जालना : जिल्ह्यातील लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मिशन कवचकुंडल उपक्रमांतर्गत दोन दिवसांत रेकॉर्ड ब्रेक ५० हजार ...

रेकॉर्ड ब्रेक... दोन दिवसांत ५० हजार नागरिकांचे लसीकरण
विजय मुंडे
जालना : जिल्ह्यातील लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मिशन कवचकुंडल उपक्रमांतर्गत दोन दिवसांत रेकॉर्ड ब्रेक ५० हजार २५४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आजवर जिल्ह्यातील ७ लाख ४ हजार ७२३ जणांना पहिला, तर २ लाख ४३ हजार १९६ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यात लसीकरणाचा टक्का वाढावा यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदाल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात १५ ते २५ सप्टेंबर या कालावधीत मिशन कवचकुंडल मोहीम राबविली जात आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र पवार, आरोग्य सभापती पूजा सपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली. या मोहिमेंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अश्विनी भोसले, मोहीम अधिकारी जयश्री भुसारे यांनी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, पंचायत विभागासह इतर प्रशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन लसीकरणाचे नियोजन केले आहे. या नियोजनानुसार जिल्ह्यात तब्बल २२५ केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या दिवशी २५ हजार ९९८ जणांना, तर दुसऱ्या दिवशी २४ हजार २५६ जणांचे लसीकरण करण्यात यश आले आहे. लसीकरणाच्या आजवरच्या मोहिमेत गत दोन दिवसांत झालेले लसीकरण रेकॉर्ड ब्रेक झाले आहे.
कोट
जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी मिशन कवचकुंडल उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत सर्वच प्रशासकीय विभाग, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या मदतीमुळे दोनच दिवसांत ५० हजारांवर नागरिकांचे लसीकरण झाले आहे. उर्वरित नागरिकांनीही नियोजित केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे. कोरोनातील सूचनांचे पालन करावे.
-डॉ. विवेक खतगावकर,
जिल्हा आरोग्य अधिकारी
फोटो