Recognition to MBBS college in Jalna within a month after the proposal | प्रस्तावानंतर महिन्याभरात जालन्यात एमबीबीएस महाविद्यालयाला मान्यता

प्रस्तावानंतर महिन्याभरात जालन्यात एमबीबीएस महाविद्यालयाला मान्यता

ठळक मुद्देजागेची निश्चिती करुन तातडीने प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे निर्देश

जालना : जिल्हा तिथे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ही शासनाची संकल्पना आहे.  त्यानुसार जालना येथे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारणीसाठी जागेची निश्चिती करुन तातडीने प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी बुधवारी येथे  दिले.

कोविडच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार कैलास गोरंट्याल,  जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  निमा अरोरा, अप्पर  जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, प्रभारी सहायक आयुक्त (औषध) अंजली मिटकर, डॉ. संतोष कडले, डॉ. एम.एस. बेग, डॉ. भारत सोनवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री  देशमुख म्हणाले, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारण्याची शासनाची संकल्पना आहे.  जालना जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारण्याची लोकप्रतिनिधींची मागणी असल्याने या महाविद्यालयासाठी आवश्यक असलेली जागा निश्चित करण्यात यावी.  जागा निश्चित करताना शहराला लागून तसेच ज्या ठिकाणी शहर विस्तारीकरणाची शक्यता आहे असे ठिकाण निवडण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

कोविड- १९ च्या अनुषंगाने आढावा घेताना मंत्री  देशमुख म्हणाले, कोरोनाच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यात अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करण्यात येत असुन याबाबत समाधान व्यक्त करत जिल्ह्याचा मृत्युदर कमी करण्यावर अधिक भर देण्यात यावा.  डब्ल्युएचओ व आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात ऑक्सिजन सुविधा असलेले बेड तसेच आय.सी.यू. बेड उपलब्ध राहतील याची दक्षता घ्यावी. तसेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन लाईन उपलब्ध नसेल अशा ठिकाणी रुग्णांना पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडरद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा होईल, याची काळजी घ्यावी.  रुग्णालयांना रास्त भावाने ऑक्सिजन मिळेल याकडे लक्ष देण्याबरोबरच मास्क,  नागरिकांना उपलब्ध होतील. तसेच मुबलक प्रमाणात औषधीसाठा उपलब्ध राहील या दृष्टीनेही दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

Web Title: Recognition to MBBS college in Jalna within a month after the proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.