सर्वांनी एकत्रित नांदावे हाच खरा काला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:21 IST2021-01-01T04:21:27+5:302021-01-01T04:21:27+5:30
अशोक महाराज जोशी : टेंभुर्णी येथे दत्तजयंती उत्सवात काल्याचे कीर्तन टेंभुर्णी- ज्याप्रमाणे काला करताना दहीहंडी मध्ये सर्व पदार्थ एकत्रित ...

सर्वांनी एकत्रित नांदावे हाच खरा काला
अशोक महाराज जोशी : टेंभुर्णी येथे दत्तजयंती उत्सवात काल्याचे कीर्तन
टेंभुर्णी- ज्याप्रमाणे काला करताना दहीहंडी मध्ये सर्व पदार्थ एकत्रित केले जातात त्याचप्रमाणे सर्व माणसांनी आपसी भेद विसरून एकत्रित नांदावे हाच खरा काला आहे, असे विचार अकोलादेव येथील हभप अशोक महाराज जोशी यांनी व्यक्त केले. ते गुरुवारी टेंभुर्णी येथील दत्त मंदिर प्रांगणात दत्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित कीर्तनात बोलत होते.
पुढे बोलताना महाराज म्हणाले की, गुरूदत्त हे गुरूंचे गुरू होते. गुरू शिष्य परंपरा आजही श्रीदत्त यांच्यामुळेच पृथ्वीतलावर जीवंत आहे. दत्तजयंती निमित्ताने ठिकठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारे गुरूचरित्रांचे पारायण यातच गुरू दत्तांचे महात्म्य लपलेले आहे.
आज केवळ गावातच नाही तर घराघरांंत कलह सुरू आहे. सर्वांनी निस्वार्थ कर्म केले तर कलह आपोआपच संपेल. तेव्हा माणसांनी आपसी भेदभाव विसरून आनंदाने एकत्रित नांदावे असेही ते म्हणाले. हे वर्ष कोरोना वर्ष म्हणून घोषित झाले असले तरी कोरोनाने वाईट अनुभवांसोबत माणसाला अंतर्मुख होण्यास भाग पाडले. कोरोनाने माणसाला आपले अस्तित्व किती शुल्लक आहे हे दाखवून दिले. यातून सर्वांनी माणुसकीचा बोध घ्यावा असेही ते म्हणाले.
या किर्तनाला सामाजिक अंतर ठेवीत मोजकाच भक्तपरिवार उपस्थित होता. यावेळी संस्थानचे अध्यक्ष देवराव देशमुख, सचीव राम देव, विश्वस्त प्रा. दत्ता देशमुख, बालाजी जोशी, महादू भागवत, रघुराम उखर्डे आदींची उपस्थिती होती.
फोटो- टेंभुर्णी येथे दत्तजयंती निमित्त आयोजित काल्याचे कीर्तन करताना अशोक महाराज जोशी.
इनसेट मध्ये येथील पुरातन दत्त मूर्तीला अशी आकर्षक सजावट करण्यात आली होती.