‘समृद्धी’च्या जमिनीवर ‘रेडीमेड’ झाडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:18 IST2018-03-05T00:17:39+5:302018-03-05T00:18:11+5:30

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित जमिनीच्या मोजणीत मूल्यांकन वाढवून घेण्यासाठी संयुक्त मोजणीपूर्वीच अनेकांनी बाहेरून आणलेली रेडीमेड झाडे लावून, ती जुनीच असल्याचे दाखविले. तर काही ठिकाणी फळबागांमधील झाडांची संख्या अधिक दाखवून मूल्यांकन वाढवून कोट्यवधी रुपये पदरात पाडून घेण्याचे प्रकार जालना, औरंगाबाद जिल्ह्यात घडले आहेत.

'Ready-made' trees on the land of 'Samrudhi'! | ‘समृद्धी’च्या जमिनीवर ‘रेडीमेड’ झाडे !

‘समृद्धी’च्या जमिनीवर ‘रेडीमेड’ झाडे !

बाबासाहेब म्हस्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित जमिनीच्या मोजणीत मूल्यांकन वाढवून घेण्यासाठी संयुक्त मोजणीपूर्वीच अनेकांनी बाहेरून आणलेली रेडीमेड झाडे लावून, ती जुनीच असल्याचे दाखविले. तर काही ठिकाणी फळबागांमधील झाडांची संख्या अधिक दाखवून मूल्यांकन वाढवून कोट्यवधी रुपये पदरात पाडून घेण्याचे प्रकार जालना, औरंगाबाद जिल्ह्यात घडले आहेत.
जालना व बदनापूर तालुक्यातील २५ गावांमधून तर औरंगाबाद जिल्ह्यातील १५ गावांमधून समृद्धी महामार्ग जाणार आहे. जालना जिल्ह्यात एकूण ५१० तर औरंगाबाद जिल्ह्यातील एक हजार ३४२ हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे. ज्या गावांमधील जमिनी समृद्धी महामार्गात जाणार आहे, तिथे सुरुवातीला खुणा रोवून मार्किंग करण्यात आली होती. सॅटेलाईटद्वारे जमिनीचे सर्वेक्षण करून छायाचित्रे घेण्यात आली होती. सॅटेलाईटद्वारे मोजणीची पूर्वकल्पना असल्याने अनेक गावांमध्ये बड्या शेतक-यांनी मोठ्या आकाराची, उंच झाडे बाहेरून विकत आणून महामार्गात जाणा-या जमिनीच्या मधोमध खड्डे खोदून लावली. जालना, औरंगाबादसह, विदर्भ आणि नाशिक विभागातील गावांमध्ये हा प्रकार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. महसूल, कृषी व वनविभागामार्फत झालेल्या सयुंक्त मोजणी वेळी लहान-मोठी झाडे, विहिरी, फळबागा, ठिबक सिंचन, तुषार, गोठे आदींचे स्वतंत्र मूल्यांकन करण्यात आले. संयुक्त मोजणीत कृत्रिमरीत्या लावलेल्या झाडांची संख्याही गृहित धरण्यात आली. बदनापूर तालुक्यातील गेवराई, अकोला, निकळक, भराडखेडा, नजीकपांगरी, सोमठाणा, जालना तालुक्यातील अहंकारदेऊळगाव, तांदूळवाडी, थार, नाव्हा गुंडेवाडी, जामवाडी यासह अन्य गावांमध्ये असे प्रकार घडले आहेत. काही ठिकाणी फळबागातील झाडांची संख्या अधिका-यांनीच शेतक-यांशी चर्चा करून वाढवून दिल्याचे सूत्रांनी सांगितले. एका झाडांचे मूल्यांकन सातशे ते हजार रुपयांपर्यंत काढण्यात आले आहे. त्याचा मोबदलाही अनेकांना मिळाला आहे. अर्थातच अधिका-यांना, हा प्रकार माहीत असताना याकडे काणाडोळा करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. एकीकडे समृद्धी महामार्गातून राज्याच्या विकासाबरोबर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे काही उच्चपदस्थ या संधीचा स्वत:च फायदा करून घेण्यासाठी गुंतल्याचे दिसत आहे. या मुद्यांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसे लक्ष देणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे .

जालना : ६३ टक्के भूसंपादन पूर्ण, २९४ कोटींचा मोबदला
जालना जिल्ह्यात समृद्धी महामार्गासाठी एकूण ५१० हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. पैकी ५८९ शेतकºयांच्या ५३५ खरेदीखताच्या माध्यमातून २४६.७६ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. खाजगी व शासकीय मिळून ३२२.७५ हेक्टर जमिनीचे संपादन झाले आहे.
मोबदल्यापोटी शेतक-यांना २९४ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात खाजगी व शासकीय मिळवून ७६९.०७ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून, शेतक-यांना आतापर्यंत एकूण ७९५.९९ कोटींचा मोबदला देण्यात आला आहे.

Web Title: 'Ready-made' trees on the land of 'Samrudhi'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.