आवक घटल्याने आंब्याचे दर वधारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:49 IST2018-04-19T00:49:29+5:302018-04-19T00:49:29+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारी आंब्यांची आवक घटली आहे. परिणामी आंब्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने अक्षय्य तृतीयेला आंब्याची चव चाखणे सर्वसामान्यांना अवघड झाले आहे.

आवक घटल्याने आंब्याचे दर वधारले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारी आंब्यांची आवक घटली आहे. परिणामी आंब्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने अक्षय्य तृतीयेला आंब्याची चव चाखणे सर्वसामान्यांना अवघड झाले आहे.
बेमोसमी हवामान आणि अवकाळी पावसामुळे फळाचा राजा असलेल्या आंब्याचा पिकाला चांगला फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाल्याने परिणामी बाजारात येणारा आंबा एक महिना उशिराने बाजारात दाखल झाला आहे. आंबा बाजारात येण्याची सुरूवातच असल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी बंगळुरू, निजामाबाद, राजकोट, रायगड इ. ठिकाणांवरून लालबाग, हापूस, दसरी, केसर इ. आंब्यांची ४०० क्विंटल आवक झाली आहे. आंबा मोहरालाच असताना अवकाळी वारा वादळ आणि पावसाचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. परिणामी, गेल्या वर्षी याच महिन्यात आंब्याला ६० ते ७० टक्के मागणी होती. ती निम्म्यावर आली आहे. बाजारात आब्यांची आवक कमी असल्याने आंब्यांचे दर गगनाला भिडले आहेत. हापूस ४०० ते ५०० रूपये डझन, केसर १२० ते १५०, दसेरी ९० ते ११० लालबाग ९० ते १०० या भावाने विकला जात आहे. मात्र हेच दर गेल्या वर्षी अर्ध्यावर किमतीवर असल्याची माहिती व्यापा-यांनी दिली. मात्र भाव जास्त असल्याने अनेकांनी आंबा खरेदीकडे कानाडोळा केला. मात्र अक्षय तृतीयेनिमित्त आंब्याचे दर वाढूनही अनेकांनी पूजेसाठी आंब्यांची खरेदी करावी लागली.