Raosaheb Danve appeals to the citizens to wear mask even after getting corona vaccine | कोरोनाची लस घेतली तरी मास्क लावा, रावसाहेब दानवेंचं नागरिकांना आवाहन

कोरोनाची लस घेतली तरी मास्क लावा, रावसाहेब दानवेंचं नागरिकांना आवाहन

ठळक मुद्देआपल्या मतदारसंघातील सरकारी रुग्णालयात जाऊन दानवेंनी लसीकरण केले. तसेच, कोरोनाची लस पूर्णपणे सुरक्षित असून सर्वांनी लस टोचून कोरोनाच्या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहनही जनतेला केलं आहे.

जालना - देशभरात सोमवारपासून दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस टोचून घेण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्याअंतर्गत 1 मार्च रोजी सकाळीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोना लस टोचून घेतली. त्यानंतर आता शरद पवार यांनीही पुढाकार घेऊन मुंबईत जे.जे.रुग्णालयात कोरोना लस घेतली. त्यानंतर, जवळपास 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेली नेतेमंडळी लस घेत आहे. केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनीही कोरोनाची लस टोचून घेतली आहे. 

आपल्या मतदारसंघातील सरकारी रुग्णालयात जाऊन दानवेंनी लसीकरण केले. तसेच, कोरोनाची लस पूर्णपणे सुरक्षित असून सर्वांनी लस टोचून कोरोनाच्या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहनही जनतेला केलं आहे. ''माझ्या लोकसभा मतदारसंघातील जालना येथील जिल्हा रुग्णालयात जाऊन आज कोविड 19 ची लस घेतली. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून सर्वांनी ही लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी व्हा. अफवांवर विश्वास ठेवू नका. लस जरी घेतली, तरी मास्क लावा, सँनिटायझर वापरा व सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळा.'', असे ट्विट दानवेंनी केले आहे. या ट्विटसोबतच लस घेतानाचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे. 


दानवेंनी ट्विट केलेल्या फोटोत लस घेतेवेळी त्यांनी तोंडाचा मास्क खाली घेतल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे, सोशल मीडियावर त्यांचा फोटो व्हायरल झाला आहे. 

राष्ट्रपतींनीही टोचली लस

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्लीतील आर्मी आर अँड आर रुग्णालयात कोरोनाची लस घेतली. यावेळी, त्यांची कन्या त्यांच्यासमवेत रुग्णालयात हजर होती. मात्र, लस घेतेवेळी रामनाथ कोविंद यांच्या तोंडाला मास्क नसल्याचे फोटोत दिसून येत आहे. त्यावरुन, त्यांचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लस घेतेवळी चेहऱ्यावरील मास्क हातात धरला होता. त्यामुळे, मोदींना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. 

आरोग्यमंत्र्यांनी खासगी रुग्णालयात घेतली लस

आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिल्ली हार्ट एंड लंग्स इंस्टीट्यूट येथे 250 रुपए देऊन कोरोनाची लस घेतली. त्यावेळी, त्यांच्या पत्नीलाही लस टोचण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लस घेतल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. वयाची साठ वर्षे पूर्ण केलेल राजकीय नेते आणि निवृत्त अधिकारी लस टोचून घेताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुंबईत जे.जे. रुग्णालयात कोरोनाची लस (Corona Vaccine) टोचून घेतली आहे. शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही कोरोनाची लस घेतली. जे.जे.रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह काही डॉक्टर पवारांसोबत उपस्थित होते.  

ज्येष्ठ नागरिकांनाच लस

दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस टोचून घेण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. तर, 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि रक्तदाब व इतर आजार असलेल्या रुग्णांनाही कोरोनाची लस देण्यात येत आहे. देशभरात 25 लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी, 6.44 लाख नागरिकांना सोमवारीच लस देण्यात आली आहे. 

Web Title: Raosaheb Danve appeals to the citizens to wear mask even after getting corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.