राजूरचे कापूस खरेदी केंद्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:16 IST2020-12-28T04:16:28+5:302020-12-28T04:16:28+5:30

राजूर : येथील कापूस खरेदी केंद्र २२ ते २८ डिसेंबर या कालावधीत बंद ठेवण्यात आले आहे. खरेदी केंद्र बंद ...

Rajur's cotton shopping center closed | राजूरचे कापूस खरेदी केंद्र बंद

राजूरचे कापूस खरेदी केंद्र बंद

राजूर : येथील कापूस खरेदी केंद्र २२ ते २८ डिसेंबर या कालावधीत बंद ठेवण्यात आले आहे. खरेदी केंद्र बंद असल्याने कापूस घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.

राजूर येथील राजुरेश्वर कॉटेक्स जिनिंगमध्ये १७ नोव्हेंबरपासून शासकीय सीसीआय योजनेतून कापूस खरेदी केंद्र सुरू केलेले आहे. एकाच महिन्यात मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी करण्यात आली आहे. यावर्षी व्यापारी कापूस खरेदी करण्यास धजावत नसून, कमी भावाने खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांनी शासकीय कापूस खरेदी केंद्राकडे मोर्चा वळवला आहे. जिनिंगमध्ये सध्या कापूस साठविण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण सांगून २२ डिसेंबरपासून तात्पुरती कापूस खरेदी बंद केली आहे. ही कापूस खरेदी २८ डिसेंबरला सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

कापूस खरेदी केंद्रावर १९८ ट्रॅक्टर व टेम्पो या वाहनांची नोंद असल्याचे बाजार समितीचे सुखदेव उगले यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या बैलगाड्यांतून आलेल्या कापसाचे सरळ मोजमाप केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांनी किरायाने ट्रॅक्टर व टेम्पो वाहनातून खरेदी केंद्रावर कापूस भरून आणलेला आहे. सध्या कापसाची खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांना वाहनाच्या किरायाचा नाहक आर्थिक भूर्दंड सोसावा लागत असल्याने त्यांच्यात नाराजी व्यक्त केली जात आहे. राजूर परिसरात शेतकरी प्रामुख्याने कापूस, मकाचे पीक घेतात; परंतु, यावर्षी सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादनात प्रचंड घट आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याचे चित्र आहे.

३९ हजार क्विंटलची खरेदी

राजूर येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर आतापर्यंत ३९ हजार १५४ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. साठवणुकीची अडचण असल्याने खरेदी बंद असून, ती लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रप्रमुख धारेआप्पा होणाघोळ यांनी दिली.

Web Title: Rajur's cotton shopping center closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.