अडीच महिन्यांतच पावसाने ओलांडली वार्षिक सरासरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:34 IST2021-08-21T04:34:52+5:302021-08-21T04:34:52+5:30
जालना : जालना जिल्ह्यात जुलै महिन्यापासून जोरदार पाऊस होत आहे. सतत पाऊस पडत असल्याने तीन महिन्यांतच पावसाने ...

अडीच महिन्यांतच पावसाने ओलांडली वार्षिक सरासरी
जालना : जालना जिल्ह्यात जुलै महिन्यापासून जोरदार पाऊस होत आहे. सतत पाऊस पडत असल्याने तीन महिन्यांतच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६०३.१० मि.मी. एवढी असून, १ जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी ६७७.७१ मि.मी. एवढा पाऊस झाला असून, त्याची वार्षिक सरासरी ९७.९४ टक्के आहे. जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपर्यंतच्या मागील २४ तासांत सरासरी ९४.९४ मि.मी पावसाची नोंद झाली आहे.
यंदा जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या उरकुन घेतल्या. परंतु, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा चिंतेत सापडला होता. मात्र, जुलै महिना उजाडताच, जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने जोरदार बॅटिंग केली. काही भागात अतिवृष्टीमुळे नदी-नाले दुथडी भरून वाहिले. परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्प जुलै महिन्यातच तुडुंब भरला. शिवाय, रखडलेल्या पेरण्याही मार्गी लागल्या. त्यामुळे बळीराजा सुखावला होता. सतत सहा ते सात दिवस पडलेल्या या पावसामुळे जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले होते. मात्र, त्यानंतर पावसाने उघडीप दिली. सलग १५ दिवस पाऊस न पडल्याने पिके सुकू लागली होती. त्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला होता.
पंधरा दिवसांपासून रुसलेल्या पावसाने जिल्ह्यात १६ ऑगस्टपासून जोरदार पुनरागमन केले आहे. जिल्ह्यात तीन दिवसांपासून सूर्यदर्शन नसून, भिजपाऊस पडत असल्याने त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. वार्षिक सरासरीच्या ९७ टक्के पाऊस पडल्याची नोंद आहे. जिल्ह्यात एक ऑगस्टनंतर जवळपास १५ ऑगस्टपर्यंत पावसाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे जोमात आलेली पिके हातातून जातात की काय, अशी भीती व्यक्त होत असतानाच, १६ नंतर पावसाने हलका ते मध्यम स्वरूपाचा जोर धरला होता. बुधवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी जिल्हाभरात भिजपाऊस पडल्याने सूर्यदर्शन झाले नाही. सर्वाधिक पाऊस मंठा तालुक्यात पडला आहे. त्यानंतर परतूर, घनसावंगी, अंबड व जालना तालुक्यांचा क्रमांक लागतो.
जिल्ह्यात जोरदार पावसाने नदी, नाल्यांना पूर आला आहे. परतूर येथील निम्न दुधना प्रकल्पात ८८ टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा झाल्याने गुरुवारी सकाळी या प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले. गेल्या महिन्याभरात या प्रकल्पाचे दरवाजे उघडण्याची ही तिसरी वेळ असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हे दरवाजे उघडल्याने दुधना नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जालन्यात जोरदार पाऊस
जालना शहर व परिसरात शुक्रवारी जोरदार पाऊस पडला. यामुळे दुधना, कुंडलिका नद्यांना पाणी आले आहे. जालना तालुक्यातील गोलापांगरी येथून वाहणारी दुधना नदी दुथडी भरून वाहत होती. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६०३.१० मि.मी. एवढी असून, १ जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी ६७७.७१ मि.मी. एवढा पाऊस झाला असून, त्याची वार्षिक सरासरी ९७.९४ टक्के आहे.
तालुकानिहाय झालेला पाऊस
जालना तालुक्यात १५.१० (६०२.४०), बदनापूर २२.८० (५८७.३०), भोकरदन १०.७० (४५६.३०), जाफराबाद ८.१० (४८२.२०), परतूर ४.०० (६७७.६०), मंठा ५.५० (६७८.१०), अंबड १७.२०(६३१.६०) घनसावंगी तालुक्यात १०.०० (६६०.७०) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.