घनसावंगी तालुक्यात पावसाने ओलांडली सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:35 IST2021-09-04T04:35:59+5:302021-09-04T04:35:59+5:30

घनसावंगी : घनसावंगी तालुक्यात जूनच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस होत आहे. यामुळे सप्टेंबर महिन्यातच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. ...

Rainfall in Ghansawangi taluka exceeded average | घनसावंगी तालुक्यात पावसाने ओलांडली सरासरी

घनसावंगी तालुक्यात पावसाने ओलांडली सरासरी

घनसावंगी : घनसावंगी तालुक्यात जूनच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस होत आहे. यामुळे सप्टेंबर महिन्यातच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

घनसावंगी तालुक्यात यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनीही लवकरच पेरणी उरकली होती. घनसावंगी तालुक्यात यंदा ८२ हजार ५६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. मात्र, तालुक्यातील सातही मंडलांत पडलेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे.

आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद रांजणी मंडलात झाली असून, या मंडलात ८९३.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. घनसावंगी मंडल दुसऱ्या क्रमांकावर असून, घनसावंगी मंडलात ८७५.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अंतरवाली मंडलात ८१०.८ मि.मी., राणी उंचेगाव मंडलात ७५१.०५ मि.मी., तीर्थपुरी मंडलात ७३९.०५ मि.मी., कुंभार पिंपळगाव मंडलात ७६०.६ मि.मी., तर जांबसमर्थ मंडलात ७२२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

घनसावंगी तालुक्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत वार्षिक ६३८.४० मि.मी. पाऊस अपेक्षित आहे. मात्र, ही अपेक्षित सरासरी यंदा सप्टेंबरच्या सुरुवातीलाच ओलांडली असून, आतापर्यंत तालुक्यात सरासरी ७९३.२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी या वेळेपर्यंत ६१० मि.मी. पावसाची नोंद झाली होती.

अतिवृष्टीमुळे बाणेगाव शिवारातील शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे, तर मंगरूळ येथील २०० हेक्टर क्षेत्रावरील पिकाला फटका बसला आहे. शिवाय गंगाकाठच्या उसाचेही मोठे नुकसान झाले आहे. घनसावंगी शहरासह, बहीरगड, बोलेगाव, भद्रेगाव, रामगव्हाण, तणवाडी, राहेरा, देवहिवहरा, एकलेहरा, तीर्थपुरी, बोडक्या, खडका, मांदळा, म. चिंचोली, कु. पिंपळगाव, सिंदखेड, जांबसमर्थ, राजाटाकळी, घोन्सी, पारडगाव, आवलगाव, राजेगाव, रांजणी, राणी उंचेगाव, गुरपिंपरी, बोलेगाव, मंगुजळगावसह दुधना तीरावरील गावांनाही अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून, सर्वच पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

पंचनामे करण्याची मागणी

तलाव क्षेत्रातील पिके पूर्णतः पाण्यात बुडाली असून, पाच हजार हेक्टरवरील कापसाचे व चार हजार हेक्टर क्षेत्रावरील मुगाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच सोयाबीनच्या पिकालाही याचा फटका बसला आहे. शिवाय तुरीचे पीक पाण्याखाली बुडाल्याने उभे पीक जागीच सोडावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Web Title: Rainfall in Ghansawangi taluka exceeded average

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.