बदनापूर ( जालना ) : तालुक्यातील पूरग्रस्त ढासला गावात मंगळवारी ( दि. १३ ) रात्री १२ वाजेच्या दरम्यान मुसळधार पावसाने एका घराची भिंत ढासळली. भिंतीच्या मलब्यात आजीआजोबासह नात दबली गेली. यात ८ वर्षीय श्रावणी मदन संगोळे हिचा जागीच मृत्यू झाला आहे. तर शांताबाई सारंगधर सोनोने ( १६ ) व सारंगधर विश्वनाथ सोनोने ( ६५ ) हे मृत मुलीचे आजी-आजोबा जखमी झाले आहेत.
सारंगधर सोनोने हे भूमिहीन मजूर आहेत. त्यांचे ढासला गावात घर आहे. त्यांना एक मुलगी असून तिचे लग्न झालेले आहे. तिची मुलगी सोनोने यांच्याकडेच राहते. मंगळवारी रात्री आजीआजोबासह मुलगी घरात झोपली होती. अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला. पावसाने घराची भिंत कोसळून तिघांच्या अंगावर पडली. यात नात श्रावणी जागीच ठार झाली. तर आजीआजोबा शांताबाई व सारंगधर हे जखमी आहेत. जखमींना गावातील अशोक नाईक, राजू सोनवणे, शिवाजी सोनवणे यांनी खाजगी वाहनाने बदनापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, आजी शांताबाई यांना अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय घाटी येथे दाखल करण्यात आले आहे.
२०१५ साली ढासला गावात महापुरामुळे जवळपास २५० घरे पडली होती. त्यावेळेस नुकसानभरपाई सोबत पक्के घरे बांधून देण्याचे आश्वासन तत्कालीन पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार, तहसीलदार यांनी गावकऱ्यांना दिले होते. कालांतराने नुकसानभरपाई मिळाली मात्र पक्के घरे अद्यापपर्यंत बांधून देण्यात आली नाही. शासनाकडून मिळणाऱ्या पक्क्या घराच्या प्रतीक्षेत ग्रामस्थ आहेत. सर्वेक्षण आणि इतर बाबी पूर्ण होऊन सुद्धा घरकुल मिळत नाही. यातूनच पावसाने भिंत कोसळल्याने बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप सरपंच राम पाटील यांनी केला असून कुटुंबाला तत्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.