रेल्वेच्या सर्वेक्षण पथकाने पिंजला शहर परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:42 IST2021-01-08T05:42:26+5:302021-01-08T05:42:26+5:30

फोटो जालना : मराठवाडा-विदर्भाला जोडणाऱ्या जालना-खामगाव रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी रेल्वे विभागाचे पथक जालन्यात दाखल झाले आहे. या पथकाने बुधवारी ...

Railway survey team from Pinjala city area | रेल्वेच्या सर्वेक्षण पथकाने पिंजला शहर परिसर

रेल्वेच्या सर्वेक्षण पथकाने पिंजला शहर परिसर

फोटो

जालना : मराठवाडा-विदर्भाला जोडणाऱ्या जालना-खामगाव रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी रेल्वे विभागाचे पथक जालन्यात दाखल झाले आहे. या पथकाने बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समिती, ड्रायपोर्टसह परिसराला भेट देऊन माहिती संकलित केली. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

जालना-खामगाव या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी मध्य रेल्वे सुरक्षा समितीचे उपमुख्य प्रबंधक सुरेश जैन यांच्यासह पाच सदस्यांचे पथक मंगळवारी जालना येथे दाखल झाले आहे. या मार्गावरील पाच तहसील परिसरातील व्यापार, उद्योग, शैक्षणिक संस्था, प्रवाशांची संख्या, कृषी मालाची आयात-निर्यात आदी विविध बाबींची पाहणी करून हे पथक रेल्वे विभागाला अहवाल देणार आहे. जैन व त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन पाहणी केली. सभापती अर्जुन खोतकर व संचालक मंडळाशी संवाद साधला.

जालना कृषी उत्पन्न बाजार समिती ही मराठवाड्यातील नावाजलेली बाजारपेठ असून, या बाजारपेठेत मराठवाड्यासह विदर्भ व संपूर्ण महाराष्ट्रातून शेतमाल विक्रीसाठी येतो. प्रामुख्याने गहू, ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, हरभरा, कापूस, रेशीम, गूळ यासह मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, फुले व भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी समितीच्या निदर्शनास आणून दिले. बियाणांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या जालना शहरात स्टील, कापड, पत्रा उद्योग मोठ्या प्रमाणावर असून, प्रस्तावित ड्रायपोर्ट प्रकल्पामुळे व्यापार व उद्योग वाढीसह रोजगाराला चालना मिळणार आहे. त्यामुळे प्रस्तावित जालना-खामगाव रेल्वे मार्गामुळे दळणवळण अधिक सोपे होऊन रेल्वे वाहतूक स्वस्त व सोयीस्कर होणार असल्याने ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल व अन्य वस्तू उपलब्ध होतील. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या रेल्वेमार्गाचा लाभ होणार आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला विदर्भात पाठविण्यास सदर रेल्वेमार्ग उपयुक्त ठरणार आहे. दरम्यान, या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन विविध विषयांची माहिती जाणून घेतली.

प्रस्तावित स्टेशन, तहसील परिसराची होणार पाहणी

हे पथक प्रस्तावित जालना-खामगाव मार्गावरील सहा तहसीलच्या ठिकाणांना भेटी देणार आहे, तसेच प्रस्तावित रेल्वे स्टेशनचीही पाहणी करणार आहे. या सर्व ठिकाणांची पाहणी करून अहवाल रेल्वे विभागाला दिला जाणार आहे. रेल्वे विभागाकडून तो अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे सादर केला जाणार आहे.

विकासाचा लोहमार्ग

मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या प्रस्तावित जालना-खामगाव रेल्वे मार्गाचे काम साठ वर्षांनंतरही प्रलंबित आहे. व्यापार, उद्योग व दळण-वळणाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार असून, मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे या लोहमार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी माजी मंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी रेल्वे सर्वेक्षण समिती पथकाकडे केली आहे.

Web Title: Railway survey team from Pinjala city area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.