मृतांची ओळख पटविताना रेल्वे पोलिसांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST2021-02-06T04:55:36+5:302021-02-06T04:55:36+5:30
जालना : जालना जिल्हा हद्दीतून जाणाऱ्या रेल्वेमार्गावर गत दोन वर्षांत २६ अपघातांची नोंद असून, यात २६ जणांचा मृत्यू झाला ...

मृतांची ओळख पटविताना रेल्वे पोलिसांची दमछाक
जालना : जालना जिल्हा हद्दीतून जाणाऱ्या रेल्वेमार्गावर गत दोन वर्षांत २६ अपघातांची नोंद असून, यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे अपघातासह रेल्वेसमोर येऊन आत्महत्या करणाऱ्यांचेही प्रमाण वाढताना दिसून येत आहे. विशेषत: बेवारस मयतांची ओळख पटविताना रेल्वे पोलिसांची दमछाक होत असून, इतर ठाण्यांतील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची या कामी मदत घेतली जात आहे.
रेल्वेस्थानकावर कायदा- सुव्यवस्था राहावी, रेल्वे अपघातानंतर जखमींना मदत मिळावी, यासाठी रेल्वे पोलिसांची टीम काम करते. जालना येथील रेल्वेस्थानकातून ये-जा करणाऱ्या प्रवासी, एक्स्प्रेस रेल्वेंची संख्या मोठी आहे. रेल्वेमार्गावरील अपघात रोखण्यासाठी ठिकठिकाणी उड्डाणपूल तयार करण्यात आले आहेत. जिल्हा हद्दीतील ग्रामीण मार्गावर गरजेनुसार फाटक तयार करण्यात आले असून, याठिकाणीही कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत; परंतु अनेक जण रेल्वे येत असतानाही अचानक रेल्वेसमोर येत असल्याने त्यांचा अपघाती मृत्यू होतो, तर अनेक जण रेल्वेखाली येऊन आत्महत्या करत आहेत. विशेषत: अनेकांचे मृतदेह रेल्वेपटरीच्या बाजूला बेवारस पडल्याचेही दिसून येते. गत दोन वर्षांतील रेल्वे पोलिसांकडे नोंद असलेल्या जवळपास २६ प्रकरणांमध्ये १६ मयतांची ओळख पटविण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे.
रेल्वे अपघात झाल्यानंतर संबंधित जखमींना शासकीय रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार केले जातात. शिवाय रेल्वे अपघात होऊ नयेत, यासाठीही रेल्वे पोलीस दलाकडून वेळोवेळी जनजागृती केली जाते; परंतु मानसिक आजाराला बळी पडलेले बहुतांश नागरिक रेल्वेखाली येऊन आत्महत्या करीत असल्याचेही दिसून येते.
१० मृतदेहांची ओळख पटली नाही
गत दोन वर्षांत अपघातातील मयतांपैकी १६ जणांची ओळख रेल्वे पोलिसांना पटली आहे, तर जवळपास १० जणांची ओळख पटलेली नाही.
बेवारस मयतांची ओळख पटली नाही, तर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाला पत्र दिले जाते. नगरपालिका प्रशासनामार्फत अंत्यसंस्कार केले जातात.
रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटविण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो. एखाद्याची ओळख पटत नसेल, तर इतर पोलीस ठाण्यांना माहिती देऊन मयताची ओळख पटविण्यासाठीही आम्ही सतत प्रयत्न करीत असतो.
-रवी देशमुख, पाेउपनि. रेल्वे पोलीस
२०१९
रेल्वे अपघात ७
मृत्यू ७
२०२०
रेल्वे अपघात १९
मृत्यू १९