तरुणीची छेडछाड; एकास बेदम चोप
By Admin | Updated: December 3, 2014 00:32 IST2014-12-03T00:29:33+5:302014-12-03T00:32:10+5:30
युवक जालन्याचा : प्रकृती बिघडल्याने सीपीआरमध्ये दाखल

तरुणीची छेडछाड; एकास बेदम चोप
कोल्हापूर : सायबर चौकात तरुणीची छेड काढणाऱ्या जालन्याच्या तरुणाला नातेवाईक व नागरिकांनी बेदम चोप देत राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. अशोक उत्तम गुजर (वय २४) असे त्याचे नाव आहे. गंभीर जखमी झाल्याने त्याला सीपीआरमध्ये अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल केले आहे. हा प्रकार आज, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुणी कावळा नाका परिसरात राहते. आज दुपारी ती सायबर चौकात आली असता संशयित अशोक गुजर तेथे आला. तिचा हात पकडून तिला ओढत नेऊ लागला. यावेळी तरुणीने विरोध करण्याचा प्रयत्न केला; परंतु तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. अखेर तरुणीने याची नातेवाईकांना माहिती दिली. नातेवाईकांनी अशोकला बेदम चोप दिला. हा प्रकार पाहून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनीही त्याला चोप देत राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. मारहाणीत तो गंभीर जखमी झाल्याने त्याला सीपीआरच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. संबंधित तरुणीची त्याची यापूर्वी ओळख होती. आम्ही दोघेजण एकमेकाला फोन व एसएमएस पाठवत होतो. तिला भेटण्यासाठी खास जालन्याहून कोल्हापुरात आलो असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. (प्रतिनिधी)