अंबड (जालना) : "राहुल गांधी निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर वारंवार शंका घेऊन देशात संभ्रम निर्माण करत आहेत. ही पद्धत केवळ त्यांच्या पक्षाला टिकवून ठेवण्यासाठी आहे. ते मतदारांचा अपमान करत असून भारतीय लोकशाहीची बदनामी करत आहेत," असा हल्लाबोल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केला. महसूल सप्ताह सांगता समारंभानिमित्त शहरात आले असता त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
शहरातील मत्स्योदरी देवी संस्थानच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात शुक्रवारी दुपारी महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ पार पडला. हा कार्यक्रम भाजप आमदार नारायण कुचे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख उपस्थित होते. यावेळी महसूल मंत्री बावनकुळे यांनी काँग्रेस पक्ष आणि खास करून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार शब्दांत टीका केली.
तसेच सरकार जनतेसमोर आपली भूमिका खुलेपणाने मांडत असून जनता दरबारासारख्या उपक्रमांतून थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करत असल्याचेही बावनकुळे यांनी नमूद केले. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिली असून, अनेक मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत," असेही ते म्हणाले.
राजकीय चर्चांना पूर्णविराम देताना त्यांनी स्पष्ट केले की, "माजी मंत्री राजेश टोपे यांनी भाजपमधील कोणत्याही नेत्याशी अद्याप संपर्क साधलेला नाही." समारंभास परिसरातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, महसूल विभागाचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.