उर्दू शाळेतील मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:28 IST2021-02-12T04:28:29+5:302021-02-12T04:28:29+5:30
जाफराबाद : शहरातील जिल्हा परिषद उर्दू शाळेची मोठी दुरवस्था झाली आहे. शाळा दुरूस्तीसह मूलभूत सोयी-सुविधांसाठी शालेय व्यवस्थापन समितीने पाठपुरावा ...

उर्दू शाळेतील मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम
जाफराबाद : शहरातील जिल्हा परिषद उर्दू शाळेची मोठी दुरवस्था झाली आहे. शाळा दुरूस्तीसह मूलभूत सोयी-सुविधांसाठी शालेय व्यवस्थापन समितीने पाठपुरावा करूनही याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी येथील विद्यार्थ्यांसह शिक्षकांची फरपट कायम आहे.
येथील उर्दू शाळेत पहिली ते पाचवीचे वर्ग असून, जवळपास १२७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना शासन व शिक्षण विभागाच्या नियमाप्रमाणे सर्व सुविधा मिळाव्या यासाठी शालेय व्यवस्थापन समिती २००८ पासून निवेदने देऊन पाठपुरावा करीत आहे. परंतु, शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे येथील विद्यार्थी आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. ८ फेब्रुवारी रोजी पुन्हा जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
इतर शाळेच्या बाबतीत शिक्षण हक्क कायदा सांगून लाखो रुपये निधी खर्च केला जात आहे. तर दुसरीकडे शहराच्या मध्य वस्तीत आणि सर्वच शासकीय कार्यालयाच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या उर्दू शाळेची दयनीय अवस्था कायम आहे. भौतिक सुविधा देण्याच्या मागणी संदर्भात व्यवस्थापन समितीने अनेक ठराव घेतले आहेत. असे असले तरी शिक्षण विभाग दुर्लक्ष का करतेय ? असा प्रश्न पालकांना पडला आहे.
कोट
शाळेच्या भिंती व टिन पत्रेही मोडकळीस आले आहेत. विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. वेळोवेळी पाठपुरावा करूनही याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. एखादी दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी शाळेची दुरूस्ती करून मूलभूत सुविधा पुरवाव्यात.
रियाज पठाण
अध्यक्ष, शालेय समिती
फोटो