कार्यमुक्त १०५ कर्मचाऱ्यांचा प्रश्न आरोग्यमंत्र्यांच्या कोर्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST2021-02-06T04:55:29+5:302021-02-06T04:55:29+5:30
जालना : कोणतीही पूर्वसूचना न देता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नियुक्त असलेल्या आणि कोरोना बाधितांची सेवा करणाऱ्या १०५ आरोग्य कर्मचाऱ्यांना ...

कार्यमुक्त १०५ कर्मचाऱ्यांचा प्रश्न आरोग्यमंत्र्यांच्या कोर्टात
जालना : कोणतीही पूर्वसूचना न देता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नियुक्त असलेल्या आणि कोरोना बाधितांची सेवा करणाऱ्या १०५ आरोग्य कर्मचाऱ्यांना अचानक कार्यमुक्त करण्यात आले आहे. बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, रिक्त जागांवरील नियुक्तीसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. त्यानुसार राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या समवेत शुक्रवारी कोविड नर्सिंगच्या शिष्टमंडळाची बैठक होणार आहे.
कोरोनाबाधितांना आप्तेष्टांनी दूर केले. परंतु, कोविड रूग्णालयात कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती मिळालेली असतानाही या १०५ कर्मचाऱ्यांनी सेवानिष्ठेने त्यांची सेवा केली. कोरोनाचे रूग्ण कमी झाले असले तरी त्याचा फैलाव जिल्ह्यात कायम आहे. परंतु, राष्ट्रीय अभियानांतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना अचानक कार्यमुक्ती आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोविड रूग्णालयात स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागातील रिक्त पदांवर नियुक्ती द्यावी, अशी मागणी लावून धरली आहे. या मागणीसाठी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालयाने या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांना सूचित केले होते. त्यानुसार आंदोलन मागे घेण्यात आले.
पालकमंत्री राजेश टोपे यांच्यापर्यंत हा विषय गेला होता. त्यानुसार शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे व कोविड नर्सिंग कर्मचारी शिष्टमंडळाची बैठक होणार आहे. या शिष्टमंडळात सकारात्मक निर्णय झाला तरच या १०५ जणांवर उपासमारीची, बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार नाही.
बैठकीतील चर्चेकडे कर्मचारी कुटुंबीयांचेही लक्ष
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोरोना बाधितांची एक दोन नव्हे तब्ब्ल १०५ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवा केली आहे. कोरोनासारख्या महामारीत प्रारंभी कोणी घराबाहेर पडत नव्हते. त्या काळात बाधितांची सेवा करून त्यांना कोरोनामुक्त करण्यात या कर्मचाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे शुक्रवारी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांसमवेत होणाऱ्या बैठकीत कोणता निर्णय घेतला जातो याकडे संबंधित कर्मचाऱ्यांसह कुटुंबीयांचे लक्ष लागले आहे.