हरभऱ्यात चार पटीने, तर गव्हाच्या पेरणीत दुपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:56 IST2021-02-06T04:56:35+5:302021-02-06T04:56:35+5:30

रबी हंगाम; मुबलक पाण्यामुळे ४३,५७६ वर पेरणी विष्णू वाकडे जालना : तालुक्यात यंदा सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाला. याचा ...

Quadruple in gram and double in wheat | हरभऱ्यात चार पटीने, तर गव्हाच्या पेरणीत दुपटीने वाढ

हरभऱ्यात चार पटीने, तर गव्हाच्या पेरणीत दुपटीने वाढ

रबी हंगाम; मुबलक पाण्यामुळे ४३,५७६ वर पेरणी

विष्णू वाकडे

जालना : तालुक्यात यंदा सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाला. याचा फायदा रबी हंगामाला झाला असून, यंदा तब्बल ४३,५७६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. हरभऱ्याची १८,८९० हेक्टरवर, तर गव्हाची ८,७९६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मुबलक पाण्यामुळे यंदा सरासरीच्या तुलनेत १७ हजार हेक्टरने पेरणी क्षेत्र वाढले आहे.

तालुक्यात सरासरी २५,७६६ हेक्टवर रबीची पेरणी होते. यंदा मात्र, मुबलक पाण्यामुळे पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. यंदा जूनच्या सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाला. जोरदार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातच ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातही पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाले व तलाव तुडुंब भरले. पावसामुळे खरीप वाया गेल्याने आता शेतकऱ्यांचे लक्ष रबी हंगामाकडे होते. शेतकऱ्यांनी मोठ्या जोमाने रबी हंगामात पिकांची पेरणी केली. त्यामुळेच यंदा रबीच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. तालुक्यात ८,७९६ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत गव्हाच्या पेऱ्यात दुपटीने वाढ झाली आहे. दुसरीकडे हरभऱ्याची, तर विक्रमी पेरणी झाली आहे. ४,२०६ हेक्टर हरभऱ्याची पेरणी अपेक्षित असते. यंदा तब्बल १८,८९० हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. सध्या दोन्ही पिके जोमात असून, शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. साळेगाव घारे येथील प्रगतिशील शेतकरी संदीप घारे यांनी सांगितले की, खरिपात काढणीच्या वेळी झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले. यंदा पाऊस चांगला झाल्याने पाणी पातळीत वाढ झाली. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रबी हंगामातील पिकांची पेरणी केली असून, शेतकऱ्यांना आता चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती व्यवसाय सुकर होत असला तरी खर्च वाढत असल्याचे हिवरा रोशनगाव येथील शेतकरी दादासाहेब भुतेकर यांनी सांगितले.

चौकट

यंदा रबी हंगामात गहू आणि हरभरा या पिकांची पेरणी करण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाचा वापर करून योग्य पाणी व्यवस्थापन करावे. पिकाची काढणी, कापणी याबाबत योग्य ती काळजी घ्यावी. पुढच्या वर्षीसाठी लागणारे बियाणे घरच्या घरी तयार करून ठेवावे.

-संतोष गाडे, तालुका कृषी अधिकारी, जालना

Web Title: Quadruple in gram and double in wheat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.