परतूर तालुक्यात ८८ कोटी रुपयांच्या कापसाची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:25 IST2021-01-14T04:25:53+5:302021-01-14T04:25:53+5:30
परतूर : तालुक्यात आजवर ८८ कोटी रुपयांच्या कापसाची खरेदी झाली आहे. विशेष म्हणजे खासगी व्यापाऱ्यांनीही आता कापसाचे दर वाढविले ...

परतूर तालुक्यात ८८ कोटी रुपयांच्या कापसाची खरेदी
परतूर : तालुक्यात आजवर ८८ कोटी रुपयांच्या कापसाची खरेदी झाली आहे. विशेष म्हणजे खासगी व्यापाऱ्यांनीही आता कापसाचे दर वाढविले आहेत. परिणामी चांगला दर मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी जिल्ह्यातच कापूस विक्रीला प्राधान्य दिले आहे.
यंदा कापसाचे उत्पन्न घटले असले तरी तालुक्यातील खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात कापसाची आवक सुरू आहे. सुरुवातीस खासगी व्यापाऱ्यांकडून कापसाला कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी सीसीआयकडे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे मोजमाप होण्यासाठी आठ-आठ दिवस लागत होते. आता खासगी व्यापाऱ्यांनीही कापसाचे दर वाढवल्याने सीसीआयच्या खरेदी केंद्रावरील गर्दी कमी झाली असून, खासगी खरेदी केंद्राकडेही शेतकरी वाहने घेऊन जात आहेत. तालुक्यात परतूर- ३, वाटूर १, सातोना १ अशी पाच खरेदी केंद्रे आहेत. या खरेदी केंद्रांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. आता खासगी व्यापारीही प्रतिक्विंटल ५४०० ते ५५०० रुपयापर्यंत दर देत आहेत, तर सीसीआयचा दर आजही ५७२५ रुपये प्रतिक्विंटल आहे. खासगी व्यापाऱ्यांच्या तुलनेत सीसीआयचा दर अधिकच आहे. आतापर्यंत सीसीआयकडून १ लाख ४९ हजार १७३ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. या कापसाची किंमत ८५ कोटी ४० लाख, १५ हजार ४२५ रुपये आहे, तर खासगी ६ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. याची किंमत ३ कोटी १२ लाख आहे. असे एकूण ८८ कोटी ४२ लाख ७ हजार ४२५ रुपये आहे. एकूणच यावर्षी सीसीआयमुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याबरोबरच कापसाची परवडही थांबली आहे.
(चौकट)
बाहेर कापूस गेला नाही
यावर्षी परराज्यातील व्यापारी कापूस खरेदीसाठी न आल्याने सर्व कापूस स्थानिक जिनिंगला मिळत आहे. त्यामुळे जिनिंगलाही मागील वर्षीच्या तुलनेत अधिक कापूस मिळत आहे. मागील वर्षी कापसाअभावी जिनिंग लवकरच बंद कराव्या लागल्या होत्या. यावर्षी मात्र कापूस मोठ्या प्रमाणात जिनिंगवर आला आहे.