खड्डे बुजविण्यासाठी ५० लाखांची तरतूद: गोरंट्याल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 00:44 IST2019-11-07T00:43:59+5:302019-11-07T00:44:37+5:30
मोठमोठे खड्डे पडल्याने ते खड्डे तातडीने बुजविण्यासाठी ५० लाख रूपये निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली.

खड्डे बुजविण्यासाठी ५० लाखांची तरतूद: गोरंट्याल
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहर व परिसरातील अनेक भागातील रस्ते पावसामुळे जवळपास वाहून गेले आहेत. मोठमोठे खड्डे पडल्याने ते खड्डे तातडीने बुजविण्यासाठी ५० लाख रूपये निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली.
बुधवारी त्यांनी मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, उपमुख्याधिकारी केशव कानपुडे तसेच अन्य प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मालमत्ता कर वसुलीसाठी जवळपास ३७ कोटी रूपयांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ते वसूल करण्यासाठी कर विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील अंतर्गत जलवाहिनी अंथरण्याच्या विषयांवरही चर्चा करण्यात आली. नागरिकांना हव्या त्या सुविधा देण्यासाठी पालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांनी आता आळस झटकून काम करण्याचे निर्देश संगीता गोरंट्याल यांनी दिले.
यावेळी विविध विभागातील निधी प्रथम रस्ते दुरूस्तीसाठी वापरला जाणार आहे. शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी गुरूवारपासून प्रारंभ होणार आहे. या बैठकीस पालिकेचे अभियंता सौद यांचीही उपस्थिती होती. बैठकीमध्ये जालना शहरातील पाणीपुरवठा करताना वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचा मुद्दाही चर्चिला गेला. यासंदर्भात जुना जालन्यातील शिष्टमंडळानेही नगराध्यक्षांची भेट घेतली.