मालमत्ता करवसुली : ५०० बड्या थकबाकीदारांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:31 IST2021-04-02T04:31:20+5:302021-04-02T04:31:20+5:30
पालिकांना त्यांच्या हक्काचे उत्पन्न मालमत्ता करवसुली आणि नळपट्टीतूनच मिळते. असे असले तरी गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या थैमानाने सर्व वसुली ठप्प ...

मालमत्ता करवसुली : ५०० बड्या थकबाकीदारांना नोटिसा
पालिकांना त्यांच्या हक्काचे उत्पन्न मालमत्ता करवसुली आणि नळपट्टीतूनच मिळते. असे असले तरी गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या थैमानाने सर्व वसुली ठप्प झाली होती. नागरिक आर्थिक अडचणीत असल्याने कोणीच गेल्या वर्षी मालमत्ता कर आणि नळपट्टी भरली नव्हती. यात काही प्रामाणिक आणि अर्थसंपन्न नागरिकांनी तो भरला होता. जालना पालिकेच्या नोंदीनुसार शहरात ६२ हजार मालमत्ता करपात्र आहेत. त्यांच्याकडे एकूण थकबाकी ही थेट ६५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ही थकबाकी गेल्या काही वर्षांतील असल्याचे सांगण्यात आले. मालमत्ता करासोबतच नळपट्टीची थकबाकीदेखील १८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्याच्या वसुलीसाठी देखील अशीच मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जालना पालिकेने गेल्या वर्षी नवीन कर आकारणी करून वाढीव मालमत्ता कराची बिले नागरिकांना दिली आहेत.
थकीत कर भरण्याचे आवाहन
जालना पालिकेचे नागरिकांकडे मालमत्ता कर आणि नळपट्टी असे दोन्ही मिळून जवळपास ८० कोटी रुपये थकले आहेत. हे पैसे नागरिकांनी टप्पे करून का होईना ते भरल्यास पालिकेचा आर्थिक डोलारा सक्षमपणे चालविता येईल, किमान ज्यांच्याकडे ऐपत आहे, त्यांनी तरी किमान थकबाकी भरून पालिकेेला सहकार्य करावे.
संगीता गोरंट्याल, नगराध्यक्षा, जालना
चौकट
गुरुवारी नूतन वसाहत परिसरात करनिरीक्षक विनोद कुरलिये आणि त्यांच्या पथकाने एका थकबाकीदाराच्या दुकानाला सील लावले. तसेच नळपट्टी न भरणाऱ्यांचे नळ कनेक्शन तोडण्याचे निर्देश मुख्याधिकारी नितीन नार्वेकर आणि पाणीपुरवठा सभापती पूनम स्वामी यांनी दिले आहेत.