खासगी व्यापारी गावात फिरकेना; खरेदी केंद्रावर मोजमाप होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:41 IST2021-01-08T05:41:23+5:302021-01-08T05:41:23+5:30
राजूर : कापूस विकत घेण्यासाठी खासगी व्यापारी गावात फिरकत नाहीत, तर दुसरीकडे शासकीय कापूस खरेदी केंद्रावर मोजमापास विलंब होत ...

खासगी व्यापारी गावात फिरकेना; खरेदी केंद्रावर मोजमाप होईना
राजूर : कापूस विकत घेण्यासाठी खासगी व्यापारी गावात फिरकत नाहीत, तर दुसरीकडे शासकीय कापूस खरेदी केंद्रावर मोजमापास विलंब होत आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी कचाट्यात सापडल्याचे चित्र राजूर परिसरात दिसून येत आहे.
राजूर येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर, टेम्पो वाहनातून विक्रीसाठी आणलेल्या कापसाला दहा ते बारा दिवस लागत आहेत. त्यातच यावर्षी ग्रामीण भागात कापूस व्यापाऱ्यांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय कापूस खरेदी केंद्राशिवाय पर्याय नाही; परंतु केंद्रावर त्यांची पिळवणूक होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. भोकरदन तालुक्यात दोनच सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू आहे. त्यामुळे कापूस विक्रीसाठी गर्दी होत आहे. राजूर परिसरात शेतकऱ्यांचे कापूस व मका प्रमुख पीक आहे. या दोन्ही पिकांवरच शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून राहते. यावर्षी सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे कपाशीच्या उत्पादनात प्रचंड घट आलेली आहे.
काही प्रमाणात निघालेला कापूस विकण्यासाठी कसरत करावी लागत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. जिल्ह्यात भोकरदन तालुक्याची व्याप्ती सर्वांत मोठी आहे. तसेच कापूस उत्पादनात तालुका अग्रेसर असताना शासनाने दोनच शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहेत. परिणामी, शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. सीसीआय केंद्रावर बैलगाडीतून आणलेल्या कापसाला प्राधान्य दिले जात आहे; परंतु अलीकडे बैलगाड्यांची संख्या तोकडी आहे. त्यामुळे त्यांना नाइलाजाने वाहनातून कापूस आणावा लागत आहे. मात्र, मोजमापास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. सध्या बहुतांश शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे.
राजूरच्या सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर वाहनांना दहा ते बारा दिवस मोजमापास लागत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. तसेच खरेदी केंद्रावर दुपारनंतर कापूस खरेदी सुरू होतो अन् सायंकाळी लवकर बंद होतो. त्यामुळे शेतकरी हैराण आहेत. खाजगी व्यापारीसुद्धा कापूस घेण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेतकरी हैराण आहेत.
-रामेश्वर नागवे, शेतकरी, खामखेडा