बैलाला सोन्याचा भाव; पारडगावच्या बाजारात अर्ध्या लाखाला मिळतेय जोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:47 IST2021-02-23T04:47:18+5:302021-02-23T04:47:18+5:30

जालना : शेतीला आधुनिकतेची जोड मिळाली. यांत्रिकीकरण झाले; परंतु आजही अनेक शेतकरी बैलांचा वापर करून शेती कसतात. दुधाळ जनावरे ...

The price of gold to the bull; In the market of Pardgaon, half a lakh pairs are available | बैलाला सोन्याचा भाव; पारडगावच्या बाजारात अर्ध्या लाखाला मिळतेय जोडी

बैलाला सोन्याचा भाव; पारडगावच्या बाजारात अर्ध्या लाखाला मिळतेय जोडी

जालना : शेतीला आधुनिकतेची जोड मिळाली. यांत्रिकीकरण झाले; परंतु आजही अनेक शेतकरी बैलांचा वापर करून शेती कसतात. दुधाळ जनावरे पाळणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. पारडगाव (ता. घनसावंगी) येथील बाजारात शेतातील ओढकाम करणाऱ्या बैलांची जोडी सध्या ६० हजार ते एक लाखापर्यंत विक्री होत आहे.

पारंपरिक शेतीला फाटा देत अनेकांनी आधुनिकतेची कास धरून शेती व्यवसाय सुरू केला आहे. असे असले तरी बैलांचा शेतीकामासाठी वापर करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. शिवाय गायी, म्हशी या दुधाळ जनावरांचेही पालन शहरी, ग्रामीण भागात केले जाते. गत काही वर्षांपासून निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला. कधी चारा-पाण्याचा प्रश्न, तर कधी रोगराई यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. पशुधनाची संख्या कमी झाली असली तरी त्यांचे बाजारातील दर चांगलेच वाढले आहेत. पारडगावसह जिल्ह्यातील इतर आठवडी बाजारांमध्ये जनावरांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते.

दोन कोटींची उलाढाल

घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील जनावरांचा बाजार जिल्ह्यात नव्हे मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. या आठवडी बाजारात जालना, बुलडाणा, परभणी, नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यातील पशुपालक, व्यापारी जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी येतात. दुधाळ जनावरांसह ओढकाम करणाऱ्या जनावरांची खरेदी-विक्री या बाजारात होते. सध्या जनावरांची खरेदी- विक्री पूर्वीपेक्षा कमी झाली आहे; परंतु जनावरांच्या खरेदी-विक्रीचे दर ४० हजार ते ८० हजारांपर्यंत जात आहेत. एका आठवडी बाजारात दीड ते दोन कोटीपर्यंत आर्थिक उलाढाल होते.

जनावरे सांभाळणे झाले कठीण

गत काही वर्षांत जनावरांची संख्या घटली आहे. असे असले तरी बाजारात जनावरांची संख्या वाढली असून, चाऱ्यासह इतर समस्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो.

- जनार्दन माकोडे, पारडगाव

जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अनेक वेळा गंभीर होतो. शिवाय जनावरे सांभाळण्यासाठी मनुष्यबळ मिळत नाही. इतर नैसर्गिक आपत्तींचाही सामना करावा लागतो.

-महेश जगधने, जामखेड

पूर्वी मोठ्या प्रमाणात गायरान जमीन उपलब्ध असल्याने चाऱ्याचा प्रश्न कमी होता. गायरान क्षेत्र घटल्याने चाऱ्याचा प्रश्न अनेक वेळा गंभीर हेातो.

-रामभाऊ चांडक, पारडगाव

दुधाळ जनावरांची मागणी घटली

जनावरांच्या चाऱ्याचा प्रमुख प्रश्न शेतकरी, पशुपालकांसमोर उभा राहिला आहे.

चाऱ्याच्या प्रश्नामुळे सध्या दुधाळ जनावरांना बाजारातील मागणी घटली आहे. बाजारात पशुपालक जरशी गायींना पसंती देत आहेत.

दुधाळ जनावरांची विक्री ३० ते ९० हजार रुपयांपर्यंत खरेदी-विक्री होत आहे.

दुधाळ जनावरांची घटणारी संख्या पाहता दुधाचे दरही शहरी, ग्रामीण भागात वाढताना दिसून येत आहेत.

बैलजोडीचा दिवसाचा खर्च

शेतकरी, पशुपालक स्वत: जनावरे सांभाळत असेल तर त्याचा खर्च कमी येतो. शेतातील कडबा नसेल तर कडबा, पेंड विकत आणावी लागते. जर शेती नसेल तर कडबा, पेंड, पाणी आदी बाबींवर खर्च करावा लागतो. सालगडी असेल तर दोन ते अडीच लाखांपर्यंत खर्च वर्षाकाठी होतो.

परतूर तालुक्यातील शेवगा येथील शेतकरी रानोजी कराडे यांची बैलजोडी.

Web Title: The price of gold to the bull; In the market of Pardgaon, half a lakh pairs are available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.