कोरोना लसीकरणाचा तालुकानिहाय सूक्ष्म आराखडा तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:29 IST2020-12-29T04:29:44+5:302020-12-29T04:29:44+5:30
जालना : कोविड-१९ मुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असून, कोरोनावरील लस लवकरच उपलब्ध होणार आहे. ही लस प्रत्येक ...

कोरोना लसीकरणाचा तालुकानिहाय सूक्ष्म आराखडा तयार करा
जालना : कोविड-१९ मुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असून, कोरोनावरील लस लवकरच उपलब्ध होणार आहे. ही लस प्रत्येक व्यक्तीपर्यंत सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी लसीकरणाचे तालुकानिहाय सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी दिल्या.
कोविड-१९ लसीकरणासाठी जिल्हा कृती दल समितीच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डॉ. सोनखेडकर यांच्यासह उपविभागीय अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसह सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी पिनाटे म्हणाले की, कोविड-१९ वरील लस लवकरच उपलब्ध होणार असून, या लसीचे तालुकानिहाय सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. पहिल्या टप्प्यामध्ये ही लस आरोग्य क्षेत्रातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना टोचण्यात येणार असून, पुढील टप्प्यांमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला ही लस टोचण्यात येणार असल्याने लसीकरणासाठी आवश्यक असलेली सर्व साधनसामग्री अद्ययावत ठेवण्याबरोबरच आवश्यक असलेली जागा सुनिश्चित करण्यात यावी. लसीकरणाबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांना मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका न राहता लस प्रत्येक घटकापर्यंत सुरक्षितरीत्या पोहोचण्यासाठी सातत्याने तालुका तसेच जिल्हास्तरावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. तसेच लसीसंदर्भात जनसामान्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची असुरक्षितता निर्माण होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घेण्याचे निर्देशही अपर जिल्हाधिकारी पिनाटे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
तातडीने माहिती सादर करावी -खतगावकर
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी तालुकानिहाय करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेत प्रत्येक तालुक्याने लसीकरणाचा सूक्ष्म आराखडा, एएफआय कीट, लसीकरणासाठीची जागा याबाबतची माहिती तातडीने सादर करण्याच्या सूचना केल्या व लसीकरणाच्या अनुषंगाने विचारलेल्या शंका व प्रश्नांचे निरसन केले.