ओबीसी विशाल मोर्चाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:25 IST2021-01-09T04:25:36+5:302021-01-09T04:25:36+5:30
संयोजन समिती : राज्यातील नेत्यांचा राहणार सहभाग जालना : ओबीसी समाजाची जनगणना करावी, यासह इतर मागण्यांसाठी २४ जानेवारी रोजी ...

ओबीसी विशाल मोर्चाची तयारी
संयोजन समिती : राज्यातील नेत्यांचा राहणार सहभाग
जालना : ओबीसी समाजाची जनगणना करावी, यासह इतर मागण्यांसाठी २४ जानेवारी रोजी जालना येथे विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या विशाल मोर्चाची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली. या मोर्चात राज्यातील अनेक नेत्यांचा सहभाग राहणार आहे.
देशातील ओबीसी समाजाची जनगणना करावी, ओबीसी समाजासह व्हीजेएनटी आणि एसबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडवावेत, यास इतर प्रमुख मागण्यांकडे राज्य व केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जालना येथे २४ जानेवारी रोजी विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या अनुषंगाने स्थापित करण्यात आलेल्या संयोजन समितीतील पदाधिकाऱ्यांनी तालुका, शहर व जिल्हापातळीवर बैठकांचे आयोजन करून मोर्चामागील पार्श्वभूमी समाजबांधवांच्या निदर्शनास आणून दिली आहे. मोर्चा यशस्वी करण्यासाठी ओबीसी समाजासह व्हीजेएनटी आणि एसबीसी समाजातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. संयोजन समितीचे संयोजन राजेंद्र राख, अशोक पांगारकर, भाऊसाहेब पाऊलबुद्धे, प्रा. सत्संग मुंढे, उद्धव पवार, ओमप्रकाश चितळकर, अॅड. संजय काळबांडे, नवनाथ वाघमारे, संतोष जमधडे, समद बागवान आदी पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे आ. कैलास गोरंट्याल यांच्या माध्यमातून राज्याचे पुरावठामंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ, राज्याचे पुनर्वसन व ओबीसी मंत्रालयाचे मंत्री विजय वडेट्टीवार, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, रासपाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर, वने, मदत व पुनर्वसनमंत्री संजय राठोड, खा. समीर भुजबळ, खा. डॉ. भागवत कराड, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आ. योगेश टिळेकर, नागपूर येथील पदवीधर मतदारसंघातील आमदार अभिजीत वंजारी, खा. विकास महात्मे, आ. नरेंद्र दराडे, आ. संतोष बांगर, आ. संदीप क्षीरसागर, आ. नरेंद्र पवार आदी नेत्यांना या मोर्चासाठी निमंत्रण दिल्याचे सांगण्यात आले.
महिला, युवतींचाही पुढाकार
समाजातील महिला पदाधिकारी व युवतींनीदेखील मोर्चा यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यातील सर्वपक्षीय ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी समाजातील आमदार आणि खासदारांनी या मोर्चासाठी उपस्थित राहण्याची ग्वाही संयोजन समितीच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती संयोजक राजेंद्र राख, अशोक पांगारकर यांनी दिली.