भाजपाच्या आंदोलनानंतर वीजपुरवठा पूर्ववत सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:37 IST2021-02-17T04:37:25+5:302021-02-17T04:37:25+5:30
भोकरदन/ हसनाबाद : महावितरणने थकीत वीजबिलासाठी कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे भाजपच्या वतीने आमदार संतोष दानवे, आमदार ...

भाजपाच्या आंदोलनानंतर वीजपुरवठा पूर्ववत सुरू
भोकरदन/ हसनाबाद : महावितरणने थकीत वीजबिलासाठी कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे भाजपच्या वतीने आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी हसनाबाद येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आमदार दानवे, आमदार कुचे यांनी महाविकास आघाडी शासनाच्या भूमिकेवर सडकून टीका केली. भाजपच्या या आंदोलनाची दखल घेत महावितरणकडून तातडीने वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
महावितरणकडून कृषी पंपांची थकीत वीजबिल वसुली सुरू आहे. शेतकऱ्यांनी शासकीय योजनेचा लाभ घेऊन वीज बिल भरावे, या मागणीसाठी थेट रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके जोमात आली आहेत. फळबागाही बहरल्या आहेत. परंतु, वीज नसल्याने विहिरीतील पाणी पिकांना देताना अडचणी येत आहेत. नैसर्गिक आपत्तीत होरपळणाऱ्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपचे आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी हसनाबाद येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आत्माराम सुरडकर, जिल्हा परिषद सदस्य गणेशबापू फुके, मधुकर दानवे, पंचायत समिती सदस्य कैलास सहाणे, सरपंच सुरेश काकाजी, बाळू पुजारी, रमेश कुमावत, राजेश कंगले, टिकाराम निमरोट, फकिरचंद इंगळे, प्रभू इंगळे, विष्णू इंगळे, गजानन इंगळे, जनाभाऊ सहाणे, मधुकर मोहिते यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते. मागण्यांचे निवेदन वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता पोहर, नायब तहसीलदार अविनाश धर्माधिकारी यांना देण्यात आले.
चौकट
आघाडी शासनाकडे नैतिक शहाणपणा नाही : दानवे
शेतकरी आस्मानी संकटांनी होरपळला आहे. खरिपातील पिके हातची गेली आहेत. सध्या रब्बी हंगाम जोमात असून, त्यावरच शेतकऱ्यांचे आर्थिक गणित जुळणार आहे. शेतकरी जगला तर देश जगणार आहे. परंतु, महाविकास आघाडी शासनाकडे नैतिक शहाणपण नसल्याने असे निर्णय घेतले जात असल्याची टीका आ. दानवे यांनी केली. तसेच यापुढे शेतकऱ्यांची गैरसोय झाली तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
फोटो