हद्दपारीच्या आदेशाला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:20 IST2021-06-10T04:20:56+5:302021-06-10T04:20:56+5:30
जाफराबाद - चिखली बससेवा सुरू जालना : लॉकडाऊननंतर प्रथमच जाफराबाद आगाराच्या वतीने प्रवाशांच्या सोयीसाठी जाफराबाद ते चिखली बससेवा सुरू ...

हद्दपारीच्या आदेशाला स्थगिती
जाफराबाद - चिखली बससेवा सुरू
जालना : लॉकडाऊननंतर प्रथमच जाफराबाद आगाराच्या वतीने प्रवाशांच्या सोयीसाठी जाफराबाद ते चिखली बससेवा सुरू केली आहे. तब्बल वर्षभरानंतर ही बस रस्त्यावर धावल्याने वरूड बु. येथील एकता मित्रमंडळ व ग्रामस्थांच्या वतीने चालक व वाहकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. राजू चिडे, गणेश ठाकरे, नरेश गव्हाड, गजानन सातव, परसराम जाधव, रामेश्वर शिंदे, दिलीप सातव, विजय ताठे, गणेश ठाकरे आदींची उपस्थिती होती.
कोरोना योध्द्यांकडून वृक्षारोपण
जालना : कोविड बाधित रुग्णांचा अंत्यविधी करणाऱ्या नगर परिषदेतील स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वृक्ष लागवड करून त्यांचे जतन करण्याचा संकल्प पर्यावरण दिनी केला आहे. अंबड रोडवरील उड्डाण पुलाजवळ असलेल्या सार्वजनिक शौचालय परिसरात उपमुख्याधिकारी महेश शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोका
जाफराबाद : शहरांतर्गत भागातील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खराब रस्त्यांमुळे चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत असून, अपघाताचाही धोका वाढला आहे. त्यात पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचत असल्याने अधिकच त्रास वाढला आहे. ही बाब लक्षात घेता नगर पालिकेने रस्त्यांची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
विरेगाव : जालना तालुक्यातील विरेगाव येथे पर्यावरण दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच अमोल जाधव, उपसरपंच सुनील चव्हाण, ग्रामसेविका शारदा साबळे, ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे, मधुकर मोठे, सुखदेव जाधव, सुरेश जाधव, दीपक खरात आदींची उपस्थिती होती.
जाफराबाद येथे पाणीटंचाई
जाफराबाद : शहराला लागूनच खडकपूर्णासारखे मोठे धरण आहे. मात्र, मागील एक ते दीड महिन्यापासून शहराला पाणीपुरवठा झालेला नाही. शिवाय, पूर्णा, धामणा आणि केळणासारख्या नद्या असताना जाफराबादचा पाणी प्रश्न कायमच आहे. मागील दीड महिन्यापासून अनेक भागांत नळाला पाणी नाही. त्यामुळे सततच्या पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
बाबुराव करतारे यांचा सत्कार
जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील डोणगाव सबस्टेशनअंतर्गत येणाऱ्या डोणगाव, देळेगव्हाण, निवडुंगा या गावात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असणारे बाबुराव करतारे हे सेवानिवृत्त झाले. याबद्दल देळेगव्हाण ग्रामस्थांनी त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी सरपंच ज्ञानेश्वर बनकर, मारूती बनकर, राष्ट्रवादीचे समाधान पंडित, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भगवान बनकर, दिनकर पंडित, कैलास पंडित, संजय पंडित आदींची उपस्थिती होती.
खोलीकरणाच्या कामाची पाहणी
जालना : औरंगाबाद रोडवरील कुंडलिका नदीपात्रातील गाळ काढण्याबरोबरच नदीच्या खोलीकरणाचे काम समस्त महाजन व नगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. या कामाची आ. कैलास गोरंट्याल व जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी पाहणी केली.