कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची सकारात्मक मानसिकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:42 IST2021-01-08T05:42:50+5:302021-01-08T05:42:50+5:30

जालना : आरोग्य विभागाच्या वतीने नुकतीच जिल्ह्यातील ठिकठिकाणी कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली. विशेष म्हणजे, पहिल्या टप्प्यात लस ...

Positive mindset of district medical officers, staff for corona vaccination | कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची सकारात्मक मानसिकता

कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची सकारात्मक मानसिकता

जालना : आरोग्य विभागाच्या वतीने नुकतीच जिल्ह्यातील ठिकठिकाणी कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली. विशेष म्हणजे, पहिल्या टप्प्यात लस घेण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय, खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी सकारात्मक असल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात आजवर १३ हजार ३०३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, उपचारादरम्यान आजवर ३५३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर उपचारानंतर १२ हजार ७४२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. विशेष म्हणजे बाधित रूग्णांवर उपचार करणारे शासकीय, खाजगी क्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारीही कोरोना बाधित झाले होते. ही बाब पाहता शासनाने पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या धर्तीवर जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जवळपास ५३ ठिकाणी कोरोना लसीची साठवणूक करण्यात येणार आहे. तर जवळपास १२० ते १२५ ठिकाणी ही लसीकरण मोहीम राबिवली जाणार आहे. आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लस घ्यावी, यासाठी शासन, प्रशासन स्तरावरून जागृती करण्यात आली आहे. विशेषत: खाजगी, सरकारी रूग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी लसीकरणातील नोंदणीस मोठा प्रतिसाद दिला आहे. डॉक्टरांच्या संघटनांचे सदस्य स्वत: लस घेणार असून, सर्वसामान्यांमध्येही लसीकरणाबाबत जनजागृती केली जाणार असल्याचेही काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरोनाला हरविण्यासाठी लसीकरण गरजेचेच

कोरोनाच्या लढाईत शासकीय, खाजगी डॉक्टरांनी एकत्रित काम केल्याने जिल्ह्यातील संक्रमण आणि मृत्यूदर कमी होण्यास मदत झाली आहे. सुरक्षेबाबत जागृतीही केली जात आहे. मात्र, कोरोनाला हरविण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे असून, लसीकरणात आम्ही सहभाग घेणार असल्याचे काही डॉक्टर, कर्मचारी म्हणाले.

कोरोना लसीकरणाची जिल्ह्यात रंगीत तालीम घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणासाठी बैठकांमध्ये जनजागृती करण्यात आली असून, शासकीय, खाजगी अधिकारी, कर्मचारी लसीकरणासाठी सकारात्मक आहेत.

- डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

कोरोना लसीकरणाबाबत शासन- प्रशासन स्तरावरून मिळणाऱ्या सूचनांनुसार आमची संघटना काम करीत आहे. बहुतांश सर्वच जणांनी नोंदणी केली असून, लसीकरणात सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उत्स्फूर्त सहभाग घेणार आहेत.

- डॉ. एम. जी. मणियार, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन

Web Title: Positive mindset of district medical officers, staff for corona vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.