पाऊस उघडल्याने खरेदीसाठी गर्दी
कुंभार पिंपळगाव : गौरी-गणपतीच्या सणामुळे बुधवारी येथील आठवडे बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. अंबड -पाथ्री रस्त्यावर बाजार समितीपुढे, नूतन वसाहत समोर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. या रस्त्यावर अनेक खासगी वाहने, दुचाकी उभी राहतात. चार पदरी रस्ता होऊनही रस्त्यावरचे दुकानदार रस्त्यावर दुकानांचे साहित्य ठेवत आहे.
जाफराबाद येथे मंडळांची घेतली बैठक
जाफराबाद : शहरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. यानिमित्त बाजारात विविध गणेश मूर्ती, सजावटींचे साहित्य उपलब्ध झालेले आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाने गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध सूचनाही केल्या आहेत.
अंनिस शाखेतर्फे मनोबल हेल्पलाईन
जालना : आर्थिक विवंचनेसह अनेक मानसिक कारणांनी अस्थितर असलेले, अस्मानी संकट, कर्जाच्या कारणांनी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसह समस्येत असलेल्या व्यक्तीसाठी अंधश्रध्दा निर्मूलन समितीने मनोबल हेल्पलाईन सुरू केली आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हिवर्डी येथे नवीन मतदार नोंदणी
जालना : जालना तालुक्यातील हिवर्डी ग्रामपंचायतीच्या वतीने नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. येथे सप्टेंबरपर्यंत नवीन मतदार नोंदणी होणार असल्याची माहिती सरपंच गणेश भुतेकर यांनी दिली आहे. भारतीय निवडणूक आयाेगाच्या नियमानुसार मतदान यादीत नाव नोंदणीसाठी जन्म पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सार्टिफिकेट, रहिवासी बाबत स्वयंघोषणा दाखला, घरातील नात्यातील (आई-वडील, भाऊ, बहीण), यापैकीचे ज्यांचे नाव अगोदर मतदार यादीत समाविष्ट असेल तर त्यांच्या मतदान ओळखपत्राची झेरॉक्स ग्रामपंचायत कार्यालयात सादर करावी, असेही ते म्हणाले.
जालन्यात औषध फवारणीला सुरूवात
जालना : मागील महिनाभरापासून शहरात साथ रोगांनी थैमान घातले आहे. त्यातच डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे पालिकेकडून औषधी फवारणीची तयारी सुरू झाली आहे. यात गुरूवारी शहरातील प्रभागांमध्ये औषध फवारणीसाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांना साहित्य देण्यात आले आहे. त्यामुळे शुक्रवारपासून शहरातील डास नियंत्रणासाठी औषध फवारणी केली जात आहे.
नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
मठपिंपळगाव : महसूल विभागाने बदनापूर व रोषणगाव या दोनच महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याचा अहवाल सादर केला आहे. गुरूवारी बदनापूर तालुक्यातील काजळा -पानखेडा गट ग्रामपंचायत तर्फे ग्रा.पं. सदस्य कैलास खंडेकर यांनी तहसीलदार पवार यांना निवेदन देऊन नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. यावेळी तहसीलदारांनी लगेच काजळा- पानखेडा गावांचा अतिवृष्टी झालेल्या गावांमध्ये समावेश करण्याचे आदेश दिले आहे. लवकरच नुकसान भरपाई मिळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.