पोलीस अधिकाऱ्याने दिले दुर्मीळ सापाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:25 IST2021-01-04T04:25:50+5:302021-01-04T04:25:50+5:30
शेषराव वायाळ परतूर : ऑनड्यूटी २४ तास राहून कायदा- सुव्यवस्थेसाठी प्रयत्न करणारे परतूर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र ...

पोलीस अधिकाऱ्याने दिले दुर्मीळ सापाला जीवदान
शेषराव वायाळ
परतूर : ऑनड्यूटी २४ तास राहून कायदा- सुव्यवस्थेसाठी प्रयत्न करणारे परतूर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांनी सर्पमित्र म्हणूनही आपली ओळख निर्माण केली आहे. कर्तव्य बजावताना प्राण्यांच्या जिवाचे रक्षण करणाऱ्या ठाकरे यांनी नुकताच घोणस या दुर्मीळ जातीच्या सापाला पकडून जीवदान दिले आहे.
हल्ली साप दिसला की ‘मार’ ही वृत्ती सर्वत्र पाहावयास मिळते. मग तो साप विषारी असो की बिनविषारी. या वृत्तीमुळे सापांची संख्या झपाट्याने घटण्याबरोबरच सापांच्या काही दुर्मिळ जातीही नामशेष होत चालल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काही सर्पमित्र लोकांमध्ये सापाविषयी असलेली भीती व गैरसमज दूर करण्याबरोबरच त्यांना जीवदान देण्याचे स्तुत्य कामही करीत आहेत. याचाच एक प्रत्यय दोन दिवसांपूर्वी परतूरकरांना आला. परतूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांनीही सर्पमित्र म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. रवींद्र ठाकरे हे दोन दिवसांपूर्वी चौकात उभे असताना अचानक एक फोन आला आणि शेतात खूप मोठा साप निघाल्याचे त्यांना समजले. त्यावेळी सपोनि. ठाकरे हे तात्काळ परतूर शिवारातील शेतात गेले. तेथे जवळपास साडेचार फूट लांबीचा घोणस हा विषारी साप होता. ठाकरे यांनी मोठ्या शिताफीने सापाला पकडून कसुरा प्रकल्पाच्या झाडाझुडपांत सोडून दिले. ठाकरे यांनी सर्पमित्र म्हणूनही आपली भूमिका बजावली आहे.
परतूरकरांनी सापाला मारू नये
सर्वच साप विषारी नसतात. त्यामुळे साप दिसला की त्याला मारू नये. सर्पमित्रांना बोलावून त्या सपाला वनक्षेत्रात सोडून द्यावे. मी गत चार वर्षांपूर्वी सर्पमित्रांकडून साप पकडण्याचे कौशल्य आत्मसात केले असून, सापांना जीवदान देता येत असल्याचे वेगळे समाधान आहे. कौशल्य आत्मसात केल्याशिवाय सापाला पकडण्याचा प्रयत्न युवकांनी करू नये.
-सपोनि. रवींद्र ठाकरे,
परतूर पोलीस ठाणे