डिझेल चोरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST2021-01-10T04:23:50+5:302021-01-10T04:23:50+5:30
जालना : नूतन वसाहत येथे छापा टाकून जालना पोलिसांनी ४६ हजार २०० रुपयांचे ५९५ लिटर डिझेल जप्त ...

डिझेल चोरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
जालना : नूतन वसाहत येथे छापा टाकून जालना पोलिसांनी ४६ हजार २०० रुपयांचे ५९५ लिटर डिझेल जप्त केले. ही कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली. दरम्यान, घटनास्थळावरून आरोपी फरार झाला असून, त्याचा तपास पोलीस करीत आहेत.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून डिझेल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी डिझेल चोरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलीस डिझेल चोरणाऱ्यांच्या मागावर असून, तालुका जालना पोलिसांनी गुरुवारी रात्री वाघ्रूळ येथे सलग चार तास पाठलाग करून डिझेल चोरी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, शहरातील नूतन वसाहत येथे काही जणांनी चोरीचे डिझेल ठेवल्याची माहिती पोलीस निरीक्षक यशवंत बागूल यांना मिळाली. या माहितीवरून सहायक पोलीस निरीक्षक संभाजी वडते यांनी या ठिकाणी छापा टाकून ४६ हजार २०० रुपयांचे ५९५ लिटर डिझेल जप्त केले. दरम्यान, आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून, त्याचा शोध घेत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक संभाजी वडते यांनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बागुले, सहायक पोलीस निरीक्षक संतोष वडते, पोलीस नाईक उगले, पोलीस कॉन्स्टेबल जारवाल, पोलीस कॉन्स्टेबल चौरे, पोलीस नाईक मोरे, वाघ, सांगळे यांनी केली.
‘त्या’ आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी
जालना तालुक्यातील वाघ्रूळ येथून रमेश दगडोबा मगरे (३८, रा. राममूर्ती), संतोष शिवसिंग जोनवाल (२५, रा. सावरगाव हडप) यांना डिझेल चोरताना पोलिसांनी पकडले होते. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक वडते यांनी दिली.