एकाच कुटुंबातील सात जणांना भगरीतून विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 19:07 IST2021-10-07T19:04:26+5:302021-10-07T19:07:00+5:30
Food Posining in Jalana : सकाळी ११ वाजता भगर खाल्ल्यानंतर सर्वच जण शेतात काम करण्यासाठी गेले होते.

एकाच कुटुंबातील सात जणांना भगरीतून विषबाधा
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील एकाच कुटुंबातील सात वर्षांच्या मुलीसह ६ जणांना गुरुवारी भगरीतून विषबाधा ( Food Posining) झाली आहे. यातील सहा जणांची प्रकृती सुधारली असून, त्यांच्यावर वडीगोद्री येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.
नवरात्र महोत्सव सुरू झाल्याने नऊ दिवस उपवास धरण्याची परंपरा आहे. त्यात गुरुवारी पहिली माळ असून, यानिमित्त अंतरवाली सराटी येथील कांताबाई एकनाथ तारख (५५), महादेव एकनाथ तारख (३४), जगन्नाथ एकनाथ तारख (२७), ज्योती महादेव तारख (३०), सीमा जगन्नाथ तारख (२२), ज्ञानेश्वरी जगन्नाथ तारख (७) यांनी सकाळी ११ वाजता भगर खाल्ली होती. त्यानंतर सर्वच जण शेतात काम करण्यासाठी गेले होते.
दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सर्व जणांना मळमळ, उलटी, थरकाप तसेच थंडीचा त्रास झाला. शेतकरी योगेश तारख यांनी वडीगोद्री येथील साई हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील सहा जणांची प्रकृती सुधारली असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉ. राजेंद्र तारख यांनी सांगितले. ज्योती तारख यांची प्रकृती खालावल्याने त्यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविले आहेत.