जाफराबाद येथे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST2021-07-09T04:20:04+5:302021-07-09T04:20:04+5:30
पक्ष निरीक्षकांचा सत्कार जालना : येथे राष्ट्रवादी महिला पक्ष निरीक्षक डॉ. प्रतिभा वैद्य, युवती मराठवाडा सचिव पल्लवी तारडे ...

जाफराबाद येथे वृक्षारोपण
पक्ष निरीक्षकांचा सत्कार
जालना : येथे राष्ट्रवादी महिला पक्ष निरीक्षक डॉ. प्रतिभा वैद्य, युवती मराठवाडा सचिव पल्लवी तारडे या आढावा बैठकीसाठी आल्या होत्या. यावेळी त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, नंदकिशोर जागडे आदींची उपस्थिती होती.
पारध येथे गरजूंना साहित्याचे वाटप
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रूक येथील रायघोळ बहुउद्देशीय संस्था संचलित स्वराजरक्षक ग्रुपच्या वतीने पारध बु. सह परिसरातील पिंपळगाव रेणुकाई, हिसोडा, कोठा कोळी आदी गावामधील गरजू लोकांना धान्य आणि किराणा साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी ग्रुपचे विकास जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यानंतरही असे उपक्रम राबविण्यात येणार आहे.
समाजभान टीमकडून गरजूंना मदत
अंबड : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुले, दुष्काळग्रस्त आणि आर्थिक दुर्बल घटकातील शेतकऱ्यांची मुले शिक्षणापासून दूर राहू नये, अशा मुलांना समाजभान टीमकडून शैक्षणिक साहित्य देण्यात आले. गणवेश, वाचन साहित्य, विरंगुळा आणि चित्रकलेचे साहित्य विद्यार्थांना देण्यात आले. एकूण ६० मुलांना या शैक्षणिक मदतीचा आधार देण्यात आला. याप्रसंगी समाजभान टीमचे पदाधिकारी उपस्थित होते.
वन समृद्धी योजनेंतर्गत रोपांचे वाटप
आष्टी : परतूर सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने तालुक्यातील गोळेगाव, सुरुमगाव, आष्टी, हातडी आदी गावांतील एकूण ५० लाभार्थ्यांना प्रत्येकी दहा रोपांचे वाटप करण्यात आले. तालुका वन अधिकारी मनीषा मगरदे यांच्या हस्ते रोपांचे वाटप करण्यात आहे. यावेळी वनपाल डी. जी. राठोड आदी उपस्थित होते. सर्व लाभार्थ्यांनी या झाडांचे संगोपन करावे, असे आवाहन करण्यात आले.
बदनापूर तालुक्यात जोरदार पाऊस
बदनापूर : मागील आठ ते दहा दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात दडी मारली. यामुळे नुकतेच जमिनीतून बाहेर येणारे अंकुर उकाडा अन् पाण्याची कमतरता यामुळे जागीच कोमेजून जात आहेत. बुधवारपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावण्याला सुरुवात केली आहे. बदनापूर तालुक्यात हलक्या सरी बरसल्या. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
अवैध देशी दारूची विक्री करणारे रडारवर
जालना : जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैधरीत्या दारु विक्री करीत असल्याच्या तक्रारी पोलीस अधीक्षकांकडे आल्या आहेत. या अनुषंगाने एसपींनी आदेश देऊन कारवाया करण्याचे सांगितले आहे. बेकायदा अवैध दारूची विक्री करणाऱ्या दोघांना गोंदी पोलिसांनी अटक केली. अमोल गरड, कैलास कोरडे अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून १ हजार ५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
वाहनाच्या धडकेत एक जण जागीच ठार
जालना : अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना जालना शहरातील नाव्हा रोडवर ३ जुलै रोजी घडली. योगेश गिरधारी मोरे (बिडकीन, ता. पैठण) असे मयताचे नाव आहे. मोरे हे मुलगी पाहण्यासाठी नातेवाइकांकडे आले होते. दरम्यान, दुचाकीवरून परतत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ते ठार झाले. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.