प्रलंबित गुन्हे लवकरच निकाली काढू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:21 IST2021-01-01T04:21:49+5:302021-01-01T04:21:49+5:30
विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना : जालना : कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासन रात्रंदिवस काम करीत होते. ...

प्रलंबित गुन्हे लवकरच निकाली काढू
विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना :
जालना : कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासन रात्रंदिवस काम करीत होते. त्यामुळे जिल्ह्यात गुन्हे प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले असून, प्रलंबित गुन्हे लवकरच निकाली काढू, असे आश्वासन औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी दिले.
गुरुवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना प्रसन्ना म्हणाले की, पोलीस आणि जनतेत समन्वय गरजेचा आहे. हा समन्वय वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, तसेच कोरोनाच्या काळात पोलीस प्रशासनाला रात्रंदिवस काम करावे लागले. पोलिसांनी पूर्ण लक्ष कोरोनाकडे केंद्रित केल्याने जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहेत. पोलिसांवर जास्तीच्या कामाचा भार आल्याने बहुतांश गुन्हे प्रलंबित आहेत. गुन्हे तात्काळ निकाली लावण्यासाठी आम्ही योजना आखली असून, लवकरच प्रलंबित गुन्हे निकाली काढू, असेही ते म्हणाले.
शहरात वाढत्या एटीएम व वाहनचोरीच्या घटनांबाबत विचारले असता, ते म्हणाले की, शहरात झालेल्या एटीएम चोरीच्या घटनांचा लवकरच छडा लावू. पोलिसांना तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रसन्ना हे मागील तीन दिवसांपासून वार्षिक तपासणीसाठी आलेले आहेत. त्यांनी पोलीस ठाण्यांची तपासणी करून प्रलंबित गुन्हे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.