गुजरातच्या बसचा नंबर वापरून महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:28 IST2021-02-07T04:28:31+5:302021-02-07T04:28:31+5:30

ट्रॅव्हल्स मालकाचा प्रताप; पोलीस तपासात उघड दीपक ढोले लोकमत न्यूज नेटवर्क जालना : गुजरात राज्यातील सुरत येथील परिवहन महामंडळाच्या ...

Passenger transport in Maharashtra using Gujarat bus number - A | गुजरातच्या बसचा नंबर वापरून महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक - A

गुजरातच्या बसचा नंबर वापरून महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक - A

ट्रॅव्हल्स मालकाचा प्रताप; पोलीस तपासात उघड

दीपक ढोले

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : गुजरात राज्यातील सुरत येथील परिवहन महामंडळाच्या बसचा नंबर वापरून महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक केल्याचा प्रताप ट्रॅव्हल्स मालक व चालकांकडून केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघड झाला आहे. यावरून ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी समोर आली आहे.

११ फेब्रुवारी २०२० रोजी लक्झरी बस क्रमांक (जीजे ०५ बीएक्स १३८२)च्या चालकाने भरधाव वगाने बस चालवून टँकरला धडक दिल्याची घटना औरंगाबाद - जालना महामार्गावरील सेलगाव येथील उड्डाणपुलावर घडली होती. या अपघातात अनेकजण गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी योगेश शंकरराव खानंदे यांच्या फिर्यादीवरून बसचालकाविरुध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना कुठलीही माहिती मिळत नव्हती. पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी हा तपास वाचक शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय पवार यांच्याकडे दिला. पोलीस निरीक्षक पवार यांनी अपघातग्रस्त बसचा नंबर तपासला. या नंबरबद्दल त्यांनी सुरत येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डी. बी. पटेल यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती घेतली असता, त्यांना संबंधित क्रमांकाची गाडी ही सुरतमध्ये असल्याचे समजले. पवार यांनी नापोका. रोहण बोरसे, पोकॉ. महेंद्र सोनवणे यांच्यासह सुरत गाठले. तेथील परिवहन महामंडळाच्या बसचा क्रमांक तपासला असता, दोन्ही बसेसचा क्रमांक एकच असल्याचे दिसून आले. अधिक तपास केला असता, संबंधित ट्रॅव्हल्स चालक गुजरात येथील परिवहन महामंडळाच्या गाडीचा नंबर वापरून महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक करीत असल्याचे समजले. त्यांनी याची माहिती पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांना दिली. पोलीस अधीक्षक देशमुख यांनी या प्रकरणाची चौकशी करून आरोपींना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.

ट्रॅव्हल्स मालकांचा मनमानी कारभार

संबंधित ट्रॅव्हल्स ही अमरावती येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. काही ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी सुरू आहे. क्षमतेपेक्षा अधिक साहित्य ट्रॅव्हल्समध्ये ठेवले जात आहे. याकडे आरटीओ विभागाकडूनही दुर्लक्ष केले जात आहे. काही ट्रॅव्हल्समालक टॅक्स वाचविण्यासाठीसुध्दा नंबरप्लेट बदलत असल्याचे दिसून आले.

कोट

बदनापूर येथे एका ट्रॅव्हल्स बसने टँकरला धडक दिली होती. या अपघाताला वर्ष उलटले आहे. ट्रॅव्हल्सचालक फरार झाला होता. आम्ही याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, ट्रॅव्हल्सचा नंबर बदलल्याचे समजले. आम्ही पुढील कारवाई करू.

दत्तात्रय पवार, पोलीस निरीक्षक

प्रवाशांनी काळजी घ्यावी

ट्रॅव्हल्सच्या अपघातात अनेकजण गंभीर जखमी होतात. त्यांना नुकसान भरपाई म्हणून ट्रॅव्हल्स कंपनीकडून पैसे दिले जातात. परंतु, ट्रॅव्हल्स मालक बसचा नंबरच बदलतात. अपघात झाला की, फरार होतात. यासाठी प्रवाशांनी बसची महिती घेऊनच प्रवास करावा, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

काय होऊ शकते कारवाई

संबंधित ट्रॅव्हल्स मालकाने नंबरप्लेट बदलून प्रवासी वाहतूक केलेली आहे. त्याच्यावर कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. नंबरप्लेट बदलल्यास १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

‘आरटीओ’कडून दुर्लक्ष

प्रत्येक लक्झरी बसची तपासणी करण्याचे काम आरटीओ विभागाचे असते. परंतु, आरटीओ विभागाकडून कुठलीही तपासणी केली जात नाही. याचा फायदा ट्रॅव्हल्स मालक घेतात. दरम्यान, आम्ही प्रत्येक बसची तपासणी करतो, असे जालना येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी सांगितले.

Web Title: Passenger transport in Maharashtra using Gujarat bus number - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.