मुख्य रस्त्यावर वाळू टाकून हायवा पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:25 IST2021-01-09T04:25:25+5:302021-01-09T04:25:25+5:30
राजूर : राजूर ते दाभाडी मार्गावरील मुख्य रस्त्यावर गुरुवारी मध्यरात्री अज्ञात हायवाचालक वाळू टाकून पसार झाला. शुक्रवारी सायंकाळपर्यंत वाळू ...

मुख्य रस्त्यावर वाळू टाकून हायवा पसार
राजूर : राजूर ते दाभाडी मार्गावरील मुख्य रस्त्यावर गुरुवारी मध्यरात्री अज्ञात हायवाचालक वाळू टाकून पसार झाला. शुक्रवारी सायंकाळपर्यंत वाळू हटविण्यात न आल्याने वाहनधारकांना त्रास सोसावा लागला. अद्याप वाळूपट्ट्यांचे लिलाव झालेले नाहीत, असे असताना ही वाळू आली कोठून आणि कोणी आणली? याचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
भोकरदन तालुक्यातील केदारखेडा व हसनाबाद परिसरातील गिरजा, पूर्णा नदीच्या पात्रातून वाळू वाहतूक सर्रास केली जात आहे. गुरुवारी मध्यरात्री अज्ञात हायवा चालकाने वाळू भरून राजूरपर्यंत आणली. परंतु, पोलीस अथवा महसूल विभागाच्या कारवाईच्या भीतीने राजूरजवळील दाभाडी मुख्य रस्त्यावर वाळू टाकून पोबारा केला. राजूर ते फुलंब्री हा वर्दळीचा रस्ता आहे. रात्रंदिवस वाहनांची या रस्त्यावरून रेलचेल सुरू असते. असे असताना शुक्रवारी दिवसभर रस्त्याच्या मध्यभागी वाळूचा ढिगारा असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागली. सायंकाळपर्यंतही वाळूचा ढिगारा रस्त्यावरच होता.
चोरट्या वाळू वाहतुकीची वाहने येथील बाजार गल्लीतील रस्त्यावरून धावत असल्याने गावातंर्गत सिमेंट रस्त्याचे तीनतेरा वाजले आहेत. तसेच भरधाव वाहनामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
फोटो ओळ : राजूरजवळील फुलंब्री मुख्य रस्त्यावर शुक्रवारी दिवसभर असलेला वाळूचा ढिगारा.