दहावी-बारावीच्या ऑफलाईन परीक्षांमुळे पालक झाले चिंतित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:38 IST2021-02-25T04:38:25+5:302021-02-25T04:38:25+5:30
जालना : एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे; तर दुसरीकडे शिक्षणमंत्र्यांनी दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...

दहावी-बारावीच्या ऑफलाईन परीक्षांमुळे पालक झाले चिंतित
जालना : एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे; तर दुसरीकडे शिक्षणमंत्र्यांनी दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयामुळे बहुतांश पालकांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे.
गतवर्षी मार्च-एप्रिल महिन्यांतच कोरोनाचा जिल्ह्यात शिरकाव झाला. त्यामुळे शाळांना कुलूप लागले. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात आले. परंतु, ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिले. शाळा सुरू झाल्या असल्या तरी कोरोनाच्या भीतीमुळे अनेकांनी शाळा नियमित केली नाही. त्यात आता कमी झालेले कोरोना रुग्ण वाढत असून, ऑफलाईन परीक्षेत सूचनांचे पालन होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते?
कोरोनामुळे मुलांचे ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षण व्यवस्थित झाले नाही. वाढणारे रुग्ण पाहता शासनाचा निर्णय योग्य वाटत नाही.
बाबासाहेब साकळकर
परतूर
कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण झालेला नाही. कोरोना वाढत असताना ऑफलाईन परीक्षा योग्य नाहीत.
गजानन भुजबळ
अंतरवाली सराटी
विद्यार्थांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन होण्यासाठी ऑफलाईन परीक्षा योग्य आहे. कोरोनातील नियमांचे पालन करून परीक्षा घ्याव्यात.
संतोष जोशी
अंबड
बारावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते?
बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेणे योग्य आहे. अनेक भागांत इंटरनेटची अडचण असून, मुलांना परीक्षेत व्यत्यय येऊ शकतो.
रमेश थोरे
अंबड
दहावीच्या परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे वाढते कोरोनाचे रुग्ण पाहता शासनाने पुनर्विचार करावा.
रंगनाथ मुळे,
कुंज
कोरोनामुळे इतर शाखेच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे बारावीच्या परीक्षाही ऑनलाईन घेण्याची गरज आहे.
संजय खैरे,
पाथरवाला खुर्द
परीक्षेचे वेळापत्रक
दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे
बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे
विद्यार्थिसंख्या
दहावी ३६०४२
बारावी ३१८२८